- सर्वसमावेशक भागीदारी करारावर चर्चा सुरू करण्यास दोन्ही नेत्यांनी दर्शविली सहमती
- भारत आणि चिली दरम्यान खनिज, ऊर्जा, अवकाश, संरक्षण, कृषी यासारख्या क्षेत्रातील संबंध होणार दृढ
गोवा खबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीत चिलीचे राष्ट्राध्यक्ष महामहीम गॅब्रिएल बोरिक फॉन्ट यांचे स्वागत केले. लॅटिन अमेरिकेतील एक प्रमुख मित्र म्हणून चिलीचे महत्त्व अधोरेखित करून, राष्ट्राध्यक्ष बोरिक यांचे स्वागत करण्याची संधी मिळाल्याबद्दल मोदी यांनी आनंद व्यक्त केला.
आपल्या चर्चेदरम्यान दोन्ही नेत्यांनी उभय देशांमधील आर्थिक संबंध वाढवण्याच्या उद्देशाने व्यापक आर्थिक भागीदारी करारासाठी चर्चा सुरू करण्यास सहमती दर्शविली. त्यांनी खनिजे, ऊर्जा, संरक्षण, अवकाश आणि कृषी यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांना सहकार्यासाठी प्रचंड क्षमता असलेली क्षेत्रे म्हणून ओळखले आणि त्यावर चर्चा केली.

चिलीमध्ये योग आणि आयुर्वेदाची वाढती लोकप्रियता हा दोन्ही देशांमधील सांस्कृतिक देवाणघेवाणीचा पुरावा म्हणून काम करत असून आरोग्यसेवा क्षेत्र निकटच्या संबंधांसाठी एक आशादायक मार्ग म्हणून उदयाला येत आहे.
विद्यार्थी विनिमय कार्यक्रम आणि इतर उपक्रमांद्वारे सांस्कृतिक आणि शैक्षणिक संबंध अधिक दृढ करण्याचे महत्त्वही दोन्ही नेत्यांनी अधोरेखित केले.