गोवा खबर : आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी सांताक्रुझ येथील गोवा राष्ट्रीय नेत्रहीन विद्यालयातील विद्यार्थ्यांसोबत रविवारी जन्मदिन साजरा केला. हा वाढदिवस साजरा करण्याचा अनुभव माझ्यासाठी अतिशय हृदयस्पर्शी होता. त्यांच्या गोड आणि निरागस स्वरांनी मन भारावून गेले. या निष्पाप आणि आनंदाने भरलेल्या सुरांनी मला मिळालेला आनंद हा सर्वात सुंदर आणि वाढदिवसाची अमूल्य भेटवस्तू ठरली आहे, असे आरोग्यमंत्री राणे यांनी अनुभव व्यक्त करताना सांगितले.
आरोग्य मंत्री म्हणाले, यावेळी माझी पत्नी डॉ. दिव्या राणे यांच्या साथीने हा क्षण अधिक खास बनवला. या मुलांच्या संघर्षशीलतेने, आनंदाने आणि जगण्याच्या जिद्दीने मन भारावले. त्यांच्या हास्यात आणि आत्मविश्वासात जीवनावर प्रेम करण्याचा एक मोठा संदेश होता. त्यांच्यामध्ये मिसळून एक वेगळाच आनंद मिळाला.
मंत्री राणे म्हणाले, हा वाढदिवस केवळ माझ्या आयुष्यातील आणखी एका वर्षाचा उत्सव नव्हता तर हे एक जबाबदारीचे स्मरण होते. समाजातील गरजू आणि विशेषत या लहानग्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याचे. त्यांच्या हसऱ्या चेहऱ्यांमागे असलेली जिद्द आणि त्यांच्या गाण्यांनी मला कायम प्रेरित केले आहे.