गोवा खबर : भाऊसाहेब बांदोडकरांनी सुरू केलेल्या मराठी प्राथमिक शाळा वाचवायच्या असतील, तर संपूर्ण प्राथमिक शिक्षणाचे इंग्रजीकरण करावे, असा सल्ला भाजपचे कळंगुटचे आमदार मायकल लोबों यांनी दिल्याने तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. शिक्षणतज्ज्ञ असल्याचा आव आणत लोबोंनी केलेल्या या विधानावर प्राचार्य सुभाष भास्कर वेलिंगकर यांनी जोरदार टीका केली आहे.
देशभर नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू असून, जागतिक शैक्षणिक सिद्धांतांनुसार प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतूनच दिले पाहिजे, यावर भर दिला जात आहे. मात्र, गोव्यात मात्र चर्चच्या इंग्रजी शाळांना अनुदान देणारे धोरण सरकारने स्वीकारले आहे. या चुकीच्या धोरणात दुरुस्ती करावी, अशी अपेक्षा असताना आमदार लोबोंचे इंग्रजीकरणाचे विधान दिशाभूल करणारे आहे, असे वेलिंगकर यांनी म्हटले.
स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांच्या जयंतीदिनी झालेल्या कार्यक्रमात लोबोंनी संपूर्ण प्राथमिक शिक्षणाचे इंग्रजीकरण करण्याचा विचार मांडला. विशेष म्हणजे, त्यांनी हा प्रस्ताव भाऊसाहेबांनी सुरू केलेल्या मराठी शाळा टिकवण्याचा उपाय म्हणून मांडला. हा त्यांचा भाऊसाहेब बांदोडकर यांच्यावरील मोठा अन्याय व अपमान आहे, असा आरोप वेलिंगकर यांनी केला.
मातृभाषाप्रेमी जनता आणि भारतीय भाषा सुरक्षा मंच यांनी आमदार मायकल लोबोंच्या या विधानाची दखल घेतली असून, हा परधार्जिण्या विचारांचा आणि शैक्षणिक तत्त्वविरोधी प्रस्ताव आहे, असा आरोप केला.