गोवा खबर : कला आणि संस्कृती खात्यातर्फे ७ आणि ८ फेब्रुवारी रोजी पणजीत सुर जहान संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कला अकादमी येथे होणाऱ्या या महोत्सवात स्थानिक तसेच देशी, विदेशी कलाकार आपली कला सादर करणार असल्याचे मंत्री गोविंद गावडे यांनी सांगितले.
गुरुवारी पणजीत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी खात्याचे संचालक सगुण वेळीप आणि अमिताव भट्टाचार्य उपस्थित होते.

८ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० ते १ दरम्यान फोकर बँड व फोककॉर्न या बँड मधील कलाकार कार्यशाळा घेणार आहेत. संध्याकाळी सहा वाजता सर्वप्रथम सोनिया शिरसाट त्यांचा कार्यक्रम होईल. यानंतर अंब्रेला एनसेंबल (आईसलँड), अल मोलर (स्वीडन) यांचे कार्यक्रम होणार आहेत. यानंतर कार्यक्रमाचा समारोप सोहळा पार पडेल. कार्यक्रम सर्वांसाठी मोफत असून प्रथम येणाऱ्यास प्रथम संधी देण्यात येईल. गोव्यातील संगीत प्रेमींनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंत्री गावडे यांनी केले.