गोवा खबर : दिव्यांग व्यक्तींना स्वतःहून प्रवास करता यावा आणि त्यांना स्वतंत्रपणे स्वतःची कामे करणे शक्य व्हावे या उद्देशाने राज्य दिव्यांगजन आयुक्त कार्यालयाच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचा एक भाग म्हणून सलिल महाले यांना निओ मोशन मोटाराइज्ड व्हीलचेअर प्रदान करण्यात आली.
राज्याचे दिव्यांगजन सक्षमीकरण विभागाचे मंत्री सुभाष फळदेसाई, राज्य दिव्यांगजन आयुक्त गुरुप्रसाद पावसकर, राज्य दिव्यांगजन सक्षमीकरण विभागाच्या संचालिका वर्षा नाईक आणि राज्य दिव्यांगजन आयुक्त कार्यालयाचे सचिव ताहा हाझिक यांच्या उपस्थितीत ही व्हीलचेअर वितरित करण्यात आली.
पावसकर म्हणाले, “दिव्यांग व्यक्तींना गतिशीलता आणि प्रवेशसुलभतेद्वारे सक्षम करणे या बाबींना आमच्या कार्यालयाने प्राधान्य दिले आहे. सलिल महाले यांना ही मोटाराइज्ड व्हीलचेअर वितरणाद्वारे दिव्यांग व्यक्तींची आत्मनिर्भरता वाढवणे आणि त्यांचे जीवनमान उंचावण्याच्या एक पाऊल आम्ही उचचले आहे. सर्वसमावेशकता वाढवणे आणि जीवनाच्या विविध क्षेत्रात कार्यरत राहण्यासाठी दिव्यांगजनांना सक्षम करणे या कामी होणाऱ्या प्रयत्नांना, उपाययोजनांना आवश्यक पाठबळ, प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
या प्रोत्साहनाबाबत कृतज्ञता व्यक्त करताना, सलिल महाले म्हणाले की, “या पाठबळ-प्रोत्साहनासाठी मी राज्य दिवयांगजन आयुक्त कार्यालयाचे, विशेषतः गुरुप्रसाद पावसकर यांचे मनापासून आभार मानतो. या मोटाराइज्ड व्हीलचेअरने माझी गतिशीलता आणि स्वातंत्र्य मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. यामुळे मी माझी दैनंदिन कामे आत्मविश्वासाने व अधिक स्वतंत्रपणे करू शकणार आहे. दिव्यांगन व्यक्तींना सक्षम करण्यासाठी त्यांनी दिलेले पाठबळ आणि त्यांचा निर्धार यासाठी मी आयुक्त कार्यालयातील संपूर्ण टीमचे मनापासून आभार मानतो.
दिव्यांग व्यक्तींना स्वतंत्रपणे हालचाल व प्रवास सुलभपणे करता यावा यासाठी राज्य दिव्यांगजन आय़ुक्त कार्यालयाने सातत्याने व्यापक प्रयत्न राबवले आहेत. सर्वसमावेशकता आणि व्यक्तिस्वातंत्र्य उपलब्ध करण्याच्या उद्देशाने कार्यालयाद्वारे यापूर्वीही दिव्यांग व्यक्तींना मोटराइज्ड ई-बाईकचे वितरण केले असून, या साधनांमुळे या दिव्यांग व्यक्तींना दैनंदिन कामे अधिक सहज, सुलभ व आत्मविश्वासाने करता येत आहेत. दिव्यांगजनांसाठी आत्मसन्मान, गतिशीलता आणि समान संधीचा अधिकार सुनिश्चित करण्याप्रती आयुक्त कार्यालयाची समर्पण भावना या विविध उपक्रमांतून प्रतिबिंबित होते.