Connect with us

गोवा खबर

फुटबॉल गोव्याचा वारसा आणि भावी पिढ्या घडवतो : अ‍ॅड. कार्लोस फरेरा

Published

on

Spread the love

गोवा खबर : फुटबॉलने गोव्याला आंतरराष्ट्रीय नकाशावर आणले आहे आणि युवा पिढीला उत्कृष्टतेसाठी झटण्यासाठी हा खेळ प्रेरणा देत आहे, असे प्रतिपादन हळदोणेचे आमदार अ‍ॅड.कार्लोस आल्वारेस फरेरा यांनी सोमवारी जीएफडीसीच्या हळदोणा केंद्रात झालेल्या फुटबॉल किट वितरण कार्यक्रमात केले.

खेळामुळे केवळ शारीरिक आणि मानसिक शक्तीच विकसित होत नाही, तर मुलांमध्ये शिस्त, सांघिक वृत्ती आणि दृढ निश्चय वाढीस लागतो. जो त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक आहे, असे फरेरा म्हणाले.

गोवा फुटबॉल विकास परिषदेने (जीएफडीसी) आयोजित केलेल्या या कार्यक्रमात हळदोणा केंद्रातून उदयोन्मुख फुटबॉलपटूंना फुटबॉल किटचे वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना फरेरा यांनी तरुणपणी भाताच्या शेतात आणि खडबडीत मैदानावर फुटबॉल खेळण्याच्या आठवणी सांगितल्या. आम्ही अनेकदा अनवाणी पायाने खेळायचो आणि स्पर्धेत खेळताना शूज घालण्याशी जुळवून घेणे अनेकांसाठी एक आव्हान होते. आज परिस्थिती बदलली आहे. अशा उपक्रमांमुळे आपली मुले आपली आवड जोपासण्यासाठी आणि राज्याचे नाव उज्ज्वल करण्यासाठी सुसज्ज झाली आहेत, असे ते म्हणाले.

यावेळी जीएफडीसीच्या सदस्य सचिव व गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या कार्यकारी संचालक डॉ. गीता नागवेकर, सेंट थॉमस गर्ल्स हायस्कूल, हळदोणाच्या मुख्याध्यापिका सिस्टर रोझरिना क्रास्टो आणि सुभाष राऊत, नतालिन कुलासो यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

डॉ. नागवेकर यांनी खेळाला शिक्षणात सामावून घेण्याचे महत्त्व अधोरेखित केले. फुटबॉल शिस्त, वेळेचे व्यवस्थापन आणि ध्येयनिश्चिती शिकवते, मुलांना निर्भय आणि चारित्र्य-प्रेरित व्यक्ती बनवते. किट्वाटप हे खेळाडूंचे संगोपन करण्यासाठी आणि त्यांना गोव्याच्या फुटबॉलमध्ये दिग्गज बनण्यासाठी तयार करण्याच्या दिशेने एक लहान परंतु प्रभावी पाऊल आहे, असे त्या म्हणाल्या.

सध्या हळदोमा केंद्रात ४५ मुले व ३५ मुलीना प्रशिक्षण दिले जाते, केंद्रप्रमुख ब्लेज डिक्रूझ यांच्या नेतृत्वाखाली प्रशिक्षक सुंदर राऊत व वॉरेल डिसोझा यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
आपल्या भाषणात सिस्टर क्रास्टाे यांनी फुटबॉलला हा केवळ खेळ नसून ती भावना असल्याचे सांगितले. यातून देश एकसंध होतो आणि जीवनाची उद्दिष्टे साध्य करण्याची उत्कंठा वाढते, असे त्या म्हणाल्या.

डॉ. नागवेकर यांनी खेळाच्या व्यापक फायद्यावर भर देताना सांगितले की, खेळामुळे शारीरिक तंदुरुस्ती वाढण्याबरोबरच चारित्र्य, आत्मविश्वास आणि सामुदायिक भावना निर्माण होते. सांघिक कार्य आणि प्रेरणा ही यशाची गुरुकिल्ली आहे आणि सामूहिक प्रयत्नांनी आम्ही गोव्याच्या फुटबॉलला अधिक उंचीवर नेऊ शकतो.

तळागाळातील फुटबॉलच्या उन्नतीसाठी जीएफडीसीच्या प्रयत्नांमध्ये हा आणखी एक मैलाचा दगड ठरला आणि या खेळातील गोव्याचा वारसा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर चमकत राहील याची खात्री या सोहळ्याने केली.