गोवा खबर:राज्यपाल श्री. पीएस श्रीधरन पिल्लई यांच्यासह गोव्याच्या प्रथम महिला श्रीमती. रिटा श्रीधरन पिल्लई यांनी आज फोडा तालुक्यातील बोरी येथील श्री सिद्धनाथ पर्वताला भेट दिली.
त्यांचे आगमन झाल्यावर जलसंपदा मंत्री श्री सुभाष शिरोडकर यांनी राज्यपालांचे स्वागत केले. यावेळी श्री नवदुर्गा देवस्थानचे अध्यक्ष श्याम प्रभू देसाई, सरपंच जयेश नाईक व इतर उपस्थित होते.
सिद्धनाथ पर्वतावर असलेल्या श्री सिद्धनाथ देवस्थानात प्रार्थना केल्यानंतर राज्यपालांनी सिद्धेश्वर पर्वताचे निसर्गसौंदर्य पाहिले. प्रसिद्ध इतिहासकार श्री संजीव सरदेसाई यांनी राज्यपालांना सिद्धेश्वर पर्वत आणि मंदिराचा इतिहास आणि इतर सविस्तर माहिती दिली.
सुरवातीस राज्यपालांनी बोरी येथील श्री नवदुर्गा देवस्थानला भेट देऊन नवदुर्गा देवतेची पूजा केली. त्यानंतर त्यांनी श्री कमलेश्वर मंदिराचे दर्शन घेतले.
राज्यपालांची सचिव श्री एमआरएम राव, आयएएस, राज्यपालांची अतिरिक्त सचिव श्री संजीव गावस देसाई, राज्यपालांचे विशेष अधिकारी श्री मिहीर वर्धन यावेळी उपस्थित होते.
गोव्यातील निवडक पर्वतांना भेट देण्यास आपल्याला आवड असून हा कार्यक्रम लवकरच हाती घेतला जाणार आहे, अशी माहिती राज्यपालांनी दिली. पुढे बोलताना राज्यपाल म्हणाले की गोव्याला समृद्ध वारसा आणि संस्कृती आहे आणि राजभवन त्यांच्या अशा पर्वतांच्या भेटींवर आधारित एक विशेष आवृत्ती पुस्तकाच्या रूपात प्रकाशित करणार असेही ते म्हणाले.
आपल्या नवीन पुस्तकात ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय पैलू प्रतिबिंबित होतील, असेही राज्यपालांनी नमूद केले.