३७ व्या क्रीडा स्पर्धेत गावकर बनला पहिला गोमंतकीय पदक विजेता
गोवा खबर: काही महिन्यांपूर्वी मॉडर्न पेंटाथलॉन प्रकाराविषयी काहीच न ऐकलेल्या आणि गावातील जत्रेतसुद्धा जूनपर्यंत कधी बंदुकीची गोळी न झाडलेल्या २२ वर्षाच्या बाबू गावकर याला गोवा असोसिएशनने राष्ट्रीय क्री़डा स्पर्धासाठी सराव करून संघ निवडताना संधी दिली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संध्याकाळी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे अधिकृत उद्घाटन होणार असतानाच, गावकर याने पुरूषांच्या लेझर रन सुवर्ण पदक पटकावून सर्व राज्यात आनंदाची एक लहर पसरवली. गुरूवारी त्याने त्यासाठी १२ः२६ ः २७ अशी वेळ नोंदवत सुवर्णाला गवसणी घातलीच, शिवाय मिश्र रिले प्रकारात सिता गोसावीसह खेळताना रौप्य पदक गोव्याला जिंकून दिले.
मॉडर्न पेंटाथलॉन हा खेळ गोव्यात खेळल्या जाणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धामध्ये प्रथमच खेळला गेला आहे. या खेळात पाच विविध प्रकार असून, लेसर रन स्पर्धेने आरंभ झालेल्या या खेळात खेळाडूला ६०० मीटरचे पाच लॅप्स पूण करावे लागतात. या प्रत्येक लॅपच्या शेवटी १० मीटर अंतरावरून लक्ष्याचा वेध घ्यावा लागताे. खेळाडूची लॅप पूर्ण करण्याची वेळ तसेच लक्ष्याची अचूकता यावर गुण दिले जातात.
मी माझ्या राज्यातच ही स्पर्धा करीत असल्यामुळे विश्वास निर्माण झाला होता कारण स्थानिक क्रीडाप्रेमींकडून मला समर्थन लाभत होते. एवढी मोठी प्रतिष्ठेची स्पर्धा गोव्यात होत असल्याने मला उत्तम कामगिरी करायची होती, असे गावकर म्हणाला. तो सांगे तालुक्यातील नेत्रावळी गावातील रहिवासी असून, प्रशिक्षणासाठी दररोज ४० किलोमीटर प्रवास करून मडगावला येत असे ट्रॅक्टर तंत्रज्ञाचा मुलगा असलेल्या गावकरची आई गृहिणी आहे. तो १३ व्या वर्षांपासून मॅरेथॉन आणि क्रॉस कंट्री शर्यतीत भाग घेत आला आहे.
मॉडर्न पेंटाथलॉनच्या स्पर्धेत कशी टक्कर दिली हे सांगताना तो म्हणाला, ४५ दिवसांपूर्वीही हातात बंदुक उचलली नव्हती, मला प्रशिक्षक नीलेश नाईक सर आणि कीर्तन वैझ सर सरावावेळी गेल्या जूनमध्ये भेटले, तेव्हापासून मी मॉडर्न पेंटाथलॉन आणि लेसर रन शिकलो.
बंदुक महाग असल्याने मला ती सरावासाठी खरेदी करणे परवडणारे नव्हते. सुदैवाने माझे प्रशिक्षक आणि मॉडर्न पेंटाथलॉन असोसिएशन यांनी माझ्यातील कसब ओळखले आणि पदक जिंकण्यासाठी लागणारा सारे समर्थन मला सतत दिले, असे गावकर म्हणाला. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी तातडीने संपर्क साधून या विजयाबद्दल त्याचे अभिनंदन केले.
मॉडर्न पेंटाथलॉन असोसिएशनचे मुख्य अधिकारी नाईक यांनी गावकर याची प्रशंसा केली. जूनमध्ये गोव्यात विविध तालुक्यांत त्याचा सराव घेताना आम्हाला बाबूमधील कौशल्य दिसून आले. मॉडर्न पेंटाथलॉनसाठी असोसिएशनकडून बंदुक विकत घेणारा तो पहिला खेळाडू होता. २.५ लाख रुपयांची बंदुक घेऊन त्याने सराव केला.
मला बाबू यांच्या कामगिरीबद्दल अभिमान वाटतो, त्याच्या यशाबद्दल मी आनंदी आहे. गोव्यातील एका दुर्गम भागातील तो रहिवासी असून मडगाव येथे प्रशिक्षणासाठी दररोज ४० किलोमीटरचा प्रवास करीत असे, पण त्याने एकही दिवस चुकवला नाही, असे ते म्हणाले.