देशभरात ७२ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ भावपूर्ण वातावरणात साजरा
गोवा खबर:जन्महिंदुपेक्षा कर्महिंदु असणे अधिक महत्त्वाचे आहे. हिंदु धर्मामध्ये ३६५ दिवसांपैकी साधारण १५० दिवस काहीतरी सण-उत्सव-व्रत-वैकल्ये असतात. हे धर्मशास्त्राप्रमाणे साजरे केले, तर कुटुंबियांवर धर्मसंस्कार होतील. कुटुंबातील मुलांचे मन धर्मपरायण होईल. धर्म आचारशील असतो. धर्माचरण केले, साधना केली, तरच खर्या अर्थाने धर्माचे आणि आपलेही रक्षण होते. साधनेमुळेच अंतरातील दिव्य ऊर्जा जागृत होते. मनोबल वाढते. आत्मशक्ती जागृत होते. या दिव्यशक्तीच्या आधारे हिंदु धर्माचे, या देवभूमी भारताचे रक्षण सहजसुलभ होणार आहे. त्यामुळे देवभूमी भारताचे रक्षण आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने हिंदूंनी साधना करण्याचा निश्चय करावा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे दक्षिण गोवा राज्य समन्वयक श्री. सत्यविजय नाईक यांनी या वेळी केले.

सनातन संस्थेच्या वतीने पणजी येथील श्री महालक्ष्मी मंदिर येथे आयोजित गुरुपौर्णिमा महोत्सवात ते बोलत होते. गोव्यात पणजीसह म्हापसा, फोंडा आणि साखळी, तसेच देशभरात ७२ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ भावपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
यानंतर ‘भारत माता की जय’ संघटनेचे राज्य सहकार्यवाहक तथा ‘हिंदू रक्षा महाआघाडी’चे सह निमंत्रक श्री. संदीप पाळणी आपल्या मार्गदर्शनात म्हणाले,‘‘भारत देशात गुरुपरंपरेला मोठे महत्व आहे. प्राचीन काळापासून देशात गुरुपरंपरा सुरू आहे. धर्मसंस्थापनेच्या कार्यातही गुरूंचा सहभाग खूप महत्वाचा आहे. हिंदू राष्ट्र होण्यासाठी सर्व शाळांमध्ये शिक्षकांशी संपर्क साधून विद्यार्थ्यांना शूरवीरांचा सत्य इतिहास शिकवला पाहिजे. तेव्हाच आपल्या मुलांचे भविष्य उज्ज्वल होऊ शकते’’.

महोत्सवाच्या प्रारंभी श्री व्यासपूजा आणि भक्तराज महाराज यांचे प्रतिमापूजन करण्यात आले. या वेळी स्वसंरक्षण प्रात्यक्षिकांचा लघुपट दाखवण्यात आला. यंदाच्या वर्षी सनातन संस्थेच्या वतीने मराठी, इंग्रजी, कन्नड, तमिळ, मल्याळम आणि तेलुगु या ६ भाषांमध्ये ऑनलाईन गुरुपौर्णिमा महोत्सवही संपन्न झाले. या माध्यमांतून देश-विदेशांतील भाविकांनी ‘गुरुपौर्णिमा महोत्सवां’चा लाभ घेतला. या वेळी सनातन संस्थेच्या मराठी भाषेतील ‘अध्यात्माचे प्रास्ताविक’ या ई-बुकचे प्रकाशन करण्यात आले.
अन्य ठिकाणी झालेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवात सनातन संस्थेच्या ‘‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवलेजी द्वारा की गुरुसेवा एवं उनका शिष्यत्व’’, ‘‘परब्रह्म डॉ. आठवलेजीकी समष्टि साधना एवं आध्यात्मिक अधिकार’’ आणि ‘‘परात्पर गुरु डॉ. आठवलेजीकी साधकोंद्वारा बताई गई विशेषताएं’’ या हिंदी भाषेतील ग्रंथांचे प्रकाशन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.