Connect with us

गोवा खबर

गोवा क्रांतीदिनी भाजप सरकारची बेरंगी वागणूक : अमरनाथ पणजीकर

Published

on

Spread the love
गोवा खबर:गोवा क्रांती दिन हा गोव्याच्या इतिहासातील एक महत्त्वाचा दिवस आहे ज्याने गोमंतकीयांच्या ह्रदयात स्वातंत्र्याची ज्योत प्रज्वलित केली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने या ऐतिहासिक सोहळ्याला बेरंगी केले आहे, हे दुःखद आणि घृणास्पद आहे, असा आरोप काँग्रेस मीडिया सेलचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर यांनी केला आहे.
स्वातंत्र्य सैनिक आणि इतरांना पाठवलेल्या ब्लॅक अँड व्हाईट आमंत्रणावर तसेच अवघ्या काही वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या कृष्णधवल जाहिरातींवर प्रतिक्रिया व्यक्त करताना अमरनाथ पणजीकर म्हणाले की, प्रसिद्धीचे वेड लागलेल्या भाजप सरकारकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्र्यांच्या रंगीत फोटोंसह जी20 जाहिरातींवर खर्च करण्यासाठी पैसे आहेत. पण गोवा क्रांती दिन आणि स्वातंत्र्य सैनिकांचा गौरव करण्यासाठी रंगीत निमंत्रण पत्रिका व जाहिराती देण्यास त्यांच्याकडे निधी नाही.
अवघ्या काही वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या कृष्णधवल जाहिरातीमध्ये डॉ. राम मनोहर लोहिया आणि डॉ. ज्युलियाव मिनेझिस यांचे फोटो नाहीत. राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे फोटो घालून स्वयं प्रसिद्धी करुन घेण्याचा भाजप सरकारचा प्रयत्न आहे. गोवा क्रांती दिनाला भाजप सरकार अशी हिन वागणूक देते याची लाज वाटते, असे अमरनाथ पणजीकर म्हणाले.
भाजप आता हुकूमशहा नरेंद्र मोदी चालवत आहेत. ते सर्वत्र हुकूमशाहीला प्रोत्साहन देत आहेत. गोवा क्रांती दिन हा हुकूमशाही सालाझार राजवटीच्या विरोधात होता म्हणून मुख्यमंत्र्यांना तो ऐतिहासीक दिवसच पुसून टाकायचा आहे का? असा प्रश्न अमरनाथ पणजीकर यांनी विचारला आहे.
ऐतिहासिक कार्यक्रम हे रंगारंग कार्यक्रमानी साजरे केले पाहिजेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्वत:चाच उदो-उदो करण्याच्या धुंदीतून बाहेर पडून इतिहासाची पुस्तके वाचावीत. त्यामुळे त्यांना गोवा क्रांती दिनाची माहिती मिळण्यास मदत होईल, असे अमरनाथ पणजीकर म्हणाले.