गोवा खबर:मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते आज पर्वरीतील सचिवालय मंत्रालयात शिक्षण संचालनालयाच्या यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर या सोशल मीडिया हँडलचा शुभारंभ करण्यात आला. शिक्षण संचालनालयाने आयोजित केलेला हा कार्यक्रम, शिक्षण खात्यासाठी समर्पित सोशल मीडिया प्लॅटफॉर्म स्थापन करण्याचे पहिले पाऊल आहे.
मानसिक आरोग्य, शारीरिक तंदुरुस्ती, परिपत्रके, इतर माहिती आणि राज्यभरातील शिक्षणाशी संबंधित विविध विषयांबद्दल जागरूकता यावरील मजकूर सहज उपलब्ध करून देणे हा या सोशल मीडिया हँडलचा उद्देश आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शिक्षण खात्याचे अभिनंदन केले आणि या व्यासपीठांमुळे होणाऱ्या फायद्याची माहिती दिली. अधिकारी, शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि सामान्य जनता आता या माध्यम हँडलद्वारे शिक्षणाशी संबंधित सर्व माहिती मिळवू शकतील यावर त्यांनी भर दिला.

शिक्षण संचालनालयांच्या राज्य कार्यक्रम समन्वयक श्री पॉल फर्नांडिस यांच्या बहुमोल सहकार्याने मीडिया हँडल्स उपलब्ध झाले.
यावेळी शिक्षण सचिव श्री प्रसाद लोलयेकर, शिक्षण संचालक, श्री शैलेश झिंगडे, एससीईआरटीचे संचालक डॉ. शंभू घाडी, उपसंचालक, डॉ. उदय गावकर, सहाय्यक संचालक श्री मनोज सावईकर, श्रीमती. सिंधू प्रभुदेसाई, श्री मेलविन डिकोस्ता आणि गोवा समग्र शिक्षाचे राज्य प्रकल्प समन्वयक उमेश सरनाईक उपस्थित होते.