गोवा खबर:भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी), गोवा 15 ते 21 मे 2023 या कालावधीत हिमाचल प्रदेश आणि लडाखमधील 50 विद्यार्थ्यांसाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमांतर्गत ‘युवा संगम’ कार्यक्रमाचा दुसरा टप्पा आयोजित करणार आहे. ‘युवा संगम’ अंतर्गत हिमाचल प्रदेशातील 35 आणि लडाखमधील 10 विद्यार्थी आणि कर्मचारी असा एकूण 50 जणांचा चमू 15 मे रोजी गोव्यात दाखल होणार आहे. हे विद्यार्थी जनसंवाद, राज्याचा इतिहास, संस्कृती आणि परंपरा जाणून घेतील तसेच गोव्याविषयी माहिती देणाऱ्या विविध उपक्रम आणि कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी त्यांना मिळणार आहे.
आयआयटीचे संचालक प्रा.बी.के. मिश्रा यांनी आज प्रसारमाध्यमांना संबोधित केले. त्यांनी सांगितले की या कार्यक्रमाचा उद्देश राष्ट्रीय एकात्मता वाढवणे आणि देशाच्या विविध भागांतील समृद्ध सांस्कृतिक वारशांची ओळख विद्यार्थ्यांना करुन देणे हा आहे. विद्यार्थ्यांची भेट पर्यटन, परंपरा, प्रगती (विकास) परस्पर संपर्क आणि तंत्रज्ञान या पाच विस्तृत क्षेत्रांवर केंद्रित आहे.
गोव्याचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि कला आणि संस्कृती, क्रीडा मंत्री गोविंद गावडे ‘युवा संगम’ दरम्यान विद्यार्थ्यांशी संवाद साधतील. त्याचप्रमाणे आयआयटी मंडी (हिमाचल प्रदेश) यांनी आयोजित केलेल्या ‘युवा संगम’ साठी गोव्यातील 50 विद्यार्थी 15 मे रोजी हिमाचल प्रदेशला रवाना होतील.

युवा संगम
‘युवा संगम’ कार्यक्रम मुख्यत्वे उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये शिकणारे विद्यार्थ्यांसाठी दौऱ्यांचे आयोजन करण्यासंदर्भात आहे. या कार्यक्रमातून जीवनासंदर्भातील विविध पैलू, प्रगतीच्या पाऊलखुणा, नवीनतम उपलब्धी आणि यजमान राज्यात युवकांशी संवादरुपाने जोडण्याचा अनुभव प्रदान करते.