गोवा खबर: जलस्त्रोतमंत्री सुभाष शिरोडकर व कुंभारजुवाचे आमदार राजेश फळदेसाई यांनी बुधवारी तिसवाडी तालुक्यातील करमळी येथे सध्या अस्तित्वात असलेल्या तळे सावत असोसिएशनच्या खाजन बांधाच्या सुधारणा कामाची पायाभरणी केली.
याच प्रकारची कामे संपूर्ण मतदारसंघात करणार असल्याचे फळदेसाई यांनी यावेळी सांगितले. ही कामे प्राधान्याने करण्यासाठी जलस्त्रोतमंत्र्यांचा पूर्ण पाठिंबा असल्याचे आमदार फळदेसाई म्हणाले. करमळी येथील या बांधाच्या कामासाठी अंदाजे 93.83 लाख रुपये खर्च येणार आहे. सदर दुरुस्ती काम भोम फोंडा येथील मेसर्स डी.के. भोमकर हे करणार आहेत.
सदर नाल्याची लांबी 580 मीटर आहे. बांधाची उंची वाढवणे, लॅटेराईट दगडांच्याधारे संरक्षक भिंत बांधणे तसेच 1.8 मीटर उंचीच्या सीमेंट काँक्रिटचा यामध्ये समावेश आहे. 15 एप्रिल रोजी कामाला सुरूवात होणे अपेक्षित असून 12 डिसेंबरपर्यंत काम पूर्ण केले जाणार आहे.
मागील वर्षी कुंभारजुवेचे आमदार म्हणून निवडून आल्यानंतर फळदेसाई यांनी बांध तसेच सांत इस्तेव, दिवाडी व कुंभारजुवामधील खाजन जमिनीमधील मानशीच्या दरवाजांच्या दुरुस्तीचे काम प्राधान्याने हाती घेण्यात येणार असल्याचे सांगितले होेते. पाण्यांच्या साठ्यांचे जतन करतानाच काही साठे पुनरुज्जीवित करण्याचे काम मतदारसंघात लवकरच हाती घेतले जाणार असल्याचे फळदेसाई यांनी सांगितले. पोषक जमिनीत शेतीसाठी प्रोत्साहन देण्यात येणार असून पाण्याच्या वाढत्या पातळीपासून धोका असलेल्या जागांना संरक्षित करण्याचे काम देखील करण्यात येणार असल्याचे वचन फळदेसाई यांनी दिले.
मागील वर्षी मे महिन्यात दिवाडी व करमळी येथील मोरींच्या मोडलेल्या दरवाजांची पाहणी करून बांधांच्या दुरुस्तीचे व पाणी साचलेल्या जागेंमधील पाणी हटविण्याचे आश्वासन दिले होते.
दुरुस्तीची कामी ही जलस्त्रोत खात्यातर्फे करण्यात येणार असल्याचे आमदार म्हणाले.