गोवा खबर: गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संयुक्त विद्यमाने हस्तकला, वस्त्रोद्योग आणि कॉयर खात्याने व्यावसायिक प्रवाह फॅशन डिझायनिंग आणि मेकिंगच्या विद्यार्थ्यांसाठी दिशानिदेशन कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
हातमाग विणकामाच्या पुनरुज्जीवनासाठी दिशानिदेशन तथा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला जातो. ओरिएंटेशन कार्यक्रमात हस्तकला, वस्त्र आणि कॉयरचे संचालक श्री. अरविंद बुगडे यांनी अलीकडे कुणबी हातमागाच्या साड्यांना मोठी मागणी आहे, परंतु अकुशल कारागिरीमुळे पुरवठा मर्यादित आहे असे सांगितले. “हातमाग विणकाम हे भारतातील सर्वात मोठे रोजगार निर्माण करणारे दुसरे क्षेत्र आहे. गोव्यातील पारंपरिक हातमाग उद्योगाला आपण सहकार्य केले पाहिजे. आज हातमागाच्या वस्तूना जागतिक स्तरावर खूप मागणी आहे. आमची एका महिन्यात २००० कुणबी साड्यांचे उत्पादन करण्याची मागणी आहे, परंतु मागणी पूर्ण करू शकत नाही. शिक्षण खात्याच्या सहकार्याने फॅशन शो आयोजित करण्याची सरकारची योजना आहे ज्यामुळे या कलेला नवीन उंचीवर नेता येईल असे ते पुढे म्हणाले.
श्री. गोवा बोर्डाचे अध्यक्ष श्री.भागिरथ शेट्ये यांनी हे अभिमुखता आणि प्रशिक्षण अशाप्रकारचे पहिले आहे आणि विद्यार्थ्यांनी आपल्या पारंपरिक हातमाग,विणकामाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी प्रेरणा घेऊन कठोर परिश्रम करण्याची विनंती केली. आपल्याला हातमाग विणकाम उद्योग जपण्याची गरज आहे असे ते पुढे म्हणाले. प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना लागणाऱ्या लॉजिस्टिक गरजा आणि इतर संसाधने पाहण्यासाठी खात्याकडून सहकार्य दिले जाईल असे ते म्हणाले.