गोवा खबर: प्रथम बुक्स ह्या ना-नफा तत्त्वावर पुस्तकांचे प्रकाशन करणाऱ्या संस्थेच्या स्टोरीवीव्हर ह्या कार्यक्रमातर्फे, वर्ल्ड स्टोरीटेलिंग डेच्या निमित्ताने, लक्षावधी मुलांना नियमितपणे वाचन करायला लावण्यासाठी, #GetChildrenReading (http://bit.ly/3lgtc9N) हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
2023 सालच्या वर्ल्ड स्टोरीटेलिंग डेचा विषय ‘टुगेदर वी कॅन’ असा आहे. ह्या विषयवस्तूनुसार, समुदायांना एकत्र आणून त्यांच्याकडून आसपासच्या लहान मुलांमध्ये वाचनाची आनंददायी सवय बिंबवण्याप्रती वचन घेणारे #GetChildrenReading अभियान राबवले जाणार आहे.
लहान मुलांच्या पुस्तकांमध्ये भाषिक वैविध्याचा अभाव आणि पुस्तके मोफत व खुल्या पद्धतीने उपलब्ध न होणे हे, वाचन व अध्ययनाप्रती आयुष्यभराची आवड लहान मुलांच्या मनात निर्माण करण्यामधील, अडथळे आहेत. स्टोरीवीव्हर (www.storyweaver.org.in) हे लहान मुलांच्या गोष्टींच्या बहुभाषिक पुस्तकांचे भारतातील पहिले ओपन सोर्स, डिजिटल भंडार ही तफावत भरून काढण्यात मदत करत आहे.
#GetChildrenReading उपक्रमाद्वारे वाचनाशी संबंधित अनुभव साप्ताहिक तत्त्वावर दिला जातो. केवळ पोस्टरवरील क्यूआर कोड स्कॅन करून अभियानाच्या पेजवर जाऊन कोणीही ह्यात सहभागी होऊ शकते. पेजवर नमूद केलेली गोष्टींची पुस्तके लहान मुलांसोबत वाचण्याची एक साधी शपथ तेथे दिली जाते. तसेच ही शपथ घेणारे ह्याचा त्यांच्या संबंधितांमध्ये प्रसार करू शकतात आणि अधिकाधिक लोकांना ह्यात सहभागी होण्यासाठी प्रेरणा देऊ शकतात. तसेच शपथ पूर्ण केल्याबद्दल त्यांना बक्षिसेही दिली जातात. दर आठवड्याला स्टोरीवीव्हरतर्फे 50 भाषांमधील गोष्टीची पुस्तके उपलब्ध करून दिली जातात. ह्या भाषांमध्ये इंग्रजी, हिंदी, कन्नड, मराठी, तमीळ, फ्रेंच, स्पॅनिश आदी भाषांचा समावेश तर आहेच, शिवाय, गोंडी, कोकणी, मैथिली, सिंधी, सुर्जापुरी आणि अशाच आणखी काही आजपर्यंत दुर्लक्षित राहिलेल्या भाषांतील पुस्तकांचाही समावेश आहे. 8 सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनी, लहान मुलांमध्ये वाचनसंस्कृतीची जोपासना करण्याच्या उद्दिष्टासह, अभियानाची सांगता केली जाणार आहे.
शिक्षण संचालनालय, गोवा; समग्र शिक्षा अभियान, छत्तीसगढ तसेच राजस्थानातील शेअर अ बुक फाउंडेशन, बिहारमधील किशनगंज येथील आझाद इंडिया फाउंडेशन ह्यांसारख्या दुर्लक्षित समुदायांसोबत काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था ह्यांसारखे सहयोगी अभियान पुढे घेऊन जात आहेत. पहिली काही वाचनसत्रे गोवा, राजस्थान व बिहारमधील शाळांमध्ये घेण्यात आली आहेत. गोव्याच्या एससीईआरटीचे संचालक श्री. नागराज जी. होन्नेकरी म्हणाले, “लहान मुले जेव्हा आजूबाजूच्या लोकांना वर्तमानपत्रापासून पुस्तकापर्यंत काहीही वाचताना बघतात, तेव्हा तीही वाचण्यास सुरुवात करतात. प्रथम बुक्स स्टोरीवीव्हरशी तसेच #GetChildrenReading उपक्रमाशी झालेल्या सहयोगामुळे, आम्हाला शाळेतील तसेच घराघरातील मुलांपर्यंत त्यांच्या मातृभाषेतील गोष्टी घेऊन जाण्याचा उत्साह निर्माण झाला आहे. लहान मुलांना हा उपक्रम खूप आवडेल.”
प्रथम बुक्सने गोव्याच्या शिक्षण संचालनालयासोबत बहुवार्षिक सहयोग करार केला आहे. राज्यातील 1200 शाळांमध्ये रचनाबद्ध वाचन उपक्रम स्थापन करण्यासाठी ‘गोवा इज रीडिग’ उपक्रम राबवला जात आहे. इंडस टॉवर्सचे सहाय्य लाभलेल्या या व्हेंचरपुढे संपूर्ण गोवा राज्यातील तरुण वाचकांवर प्रभाव करण्याचे लक्ष आहे आणि तो सरकारी शाळा, राज्य सरकारच्या अनुदानावर चालणाऱ्या शाळा आणि खासगी स्वायत्त शाळांमध्ये राबवला जाणार आहे. ‘गोवा इज रीडिंग’ या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट लहान मुलांमध्ये वाचनाची सवय बाणवणे हे आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण (2020) तसेच एनआयपीयूएन भारत गाइडलाइन्स ह्यांच्या शिफारशींशी सुसंगत असलेल्या या उपक्रमाच्या माध्यमातून, खुले परवाने असलेल्या उच्च दर्जाच्या इंग्रजी व मराठी गोष्टीच्या पुस्तकांना साठा, शाळा व शिक्षकांना, उपलब्ध होणार आहे. तसेच प्रथम बुक्स रीडिंग प्रोग्राममार्फत इयत्ता 1 ते 8साठी पूरक संसाधने उपलब्ध करून दिला जाणार आहेत. प्रथम बुक्सच्या लायब्ररी-इन-अ-क्लासरूम या उपक्रमाखाली वर्गखोल्यांमध्ये प्रत्यक्ष वाचन कोपरेही तयार केले जाणार आहे.
प्रथम बुक्स स्टोरीवीव्हरच्या वरिष्ठ संचालक श्रीमती पूर्वी शहा म्हणाल्या, “लहान मुलांच्या वाढ व विकासात गोष्टी महत्त्वाची भूमिका बजावतात. ह्या गोष्टी लहान मुलांच्या भावविश्वाला नवीन शब्दांची व कल्पनांची ओळख करून देतात आणि त्यांच्या मनाच्या सीमा विस्तारतात. #GetChildrenReading अभियानाच्या माध्यमातून परिसंस्थेतील सर्वांना आमच्यासोबत काम करण्याचे निमंत्रण देऊन वाचनाशी निगडित चळवळ तयार करण्याचा अनुभव रोमांचक आहे. आपण सगळे मिळून एकेका गोष्टीच्या माध्यमातून वाचणारा भारत घडवू शकतो.”