जी२० पदाधिकाऱ्यांनी घेतली राज्यपाल पी.एस. श्रीधरन पिल्लई यांची भेट
गोवा खबर:जी२०चे पदाधिकारी आणि प्रतिनिधी मंडळाने आज गोव्याचे राज्यपाल श्री. पी.एस. श्रीधरन यांची भेट घेऊन गोव्यातील जी२० बैठकांबाबतचा नियोजन आराखडा सादर केला.
जी-२० परिषदेसाठीचे मुख्य समन्वयक हर्ष वर्धन शृंगला, भारतीय पर्यटन मंत्रालयाचे सचिव अरविंद सिंह यांनी आगामी महिन्यापासून गोव्यात होणार असलेल्या आठ बैठकांबाबतची माहिती सादर केली. यावेळी राज्यपाल पी.एस श्रीधरन यांनी शाश्वत विकास संकल्पनेचा समावेश करण्यावर भर दिला तसेच या बैठकांदरम्यान गोव्यातील अंतर्गत भागातील पर्यटनासही प्रोत्साहन देण्याची सूचना केली.
गोव्यामध्ये या परिषदेचे स्वागत करताना राज्यपाल यांनी गोव्यातील श्रीमंत संस्कृती व वारसा यांचाही प्रसार करण्याची सूचना पदाधिकाऱ्यांना केली. गोवा प्रदेश हा सांस्कृतिक आणि वास्तुशिल्पकलेबाबत श्रीमंत प्रदेश आहे. गोव्यातील या श्रीमंत वारशाची ओळख विदेशी प्रतिनिधींना या बैठकांदरम्यान करून देण्याची गरज त्यांनी यावेळी अधोरेखित केली.
बैठकीदरम्यान राज्यपालांनी गोव्यातील निसर्ग पर्यटन व गोमंतकीय वृक्षसंपदेचा वारसा यांचाही प्रसार करण्याची गरज मांडली. जी२०ची संकल्पना ही ‘वसुधैव कुटुम्बकम्’ म्हणजे ‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ अशी असून सर्व धर्माचे लोक शांततेने व एकत्रपणे राहणाऱ्या गोव्याच्या संस्कृतीशी पूरक अशी असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.
बैठकीनंतर राज्यपालांनी पाहुण्यांना ऐतिहासिक महत्व असलेल्या राजभवन वास्तू परिसराची सफर घडवून आणली.
जी२०चे शिष्टाचार सचिव आणि राज्य नोडल अधिकारी संजित रॉड्रिग्ज याप्रसंगी उपस्थित होते.