Connect with us

गोवा खबर

शिक्षण खाते व आयएपी यांच्यामध्ये सामंजस्य करार

Published

on

Spread the love

गोवा खबर: गोव्याच्या शिक्षण खात्यातर्फे भारतीय बालरोग अकादमी (आयएपी) यांच्यासोबत संकल्प : पूर्ण स्वास्थ्य हा सामंजस्य करार करण्यात आला आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी सर्वसमावेशक प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेप्रतीची ही मोहीम असून आल्तिनो – पणजी येथे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत हा करार करण्यात आला.

शालेय विद्यार्थ्यांमध्ये मधुमेह, हायपरटेंशन यासारखे असंसर्गजन्य रोग वाढू लागल्याच्या बाबत चिंता व्यक्त करून मुख्यमंत्री म्हणाले, भारतीय बालरोग अकादमीच्या डॉक्टरांतर्फे शिक्षक, विद्यार्थी व पालक यांना मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यात हा उपक्रम मदत करेल. यात शारीरिक, मानसिक आरोग्य यावर भर देण्यात येईल आणि विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या आहाराच्या सवयी रुजविण्यात येतील. ही कार्यशाळा विनामूल्य घेतल्याबाबत मुख्यमंत्र्यांनी भारतीय बालरोग अकादमीचे कौतुक केले व हे पंतप्रधानांच्या फिट इंडिया मोहिमेला साहाय्यभूत ठरेल असे ते म्हणाले.

भारतीय बालरोग अकादमीचे अध्यक्ष डॉ. उपेंद्र किंजवडेकर यांनी कार्यक्रमाविषयी स्पष्टीकरण देताना सांगितले की हा प्रमुख कार्यक्रम पुढील शैक्षिक वर्षापासून सुरू होईल आणि त्यात पोषणसंबंधी साक्षरता सुधारणे, शारीरिक उपक्रमाला प्रोत्साहन देणे, स्क्रीन टाईम नियंत्रित करणे, मुलांचे सकारात्मक मानसिक आरोग्य, अंमली पदार्थांच्या गैरवापराचा धोका या पाच मुख्य ध्येयांवर लक्ष केंद्रित केले जाईल, ज्यांचा मुलांच्या आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो. यामध्ये ३ वर्षे ते १४ वर्षे या वयोगटातील मुले असतील. प्रशिक्षण, क्षमता विकास व देखरेखीद्वारे आम्ही शिक्षक, व पालकांपर्यंत पोहोचू, असे ते म्हणाले.

यावेळी शिक्षण संचालनालयाचे संचालक श्री. शैलेश झिंगडे, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण मंडळ गोवाचे संचालक श्री. नागराज होन्नेकरी, गोवा समग्र शिक्षाचे राज्य प्रकल्प संचालक श्री. शंभू घाडी, आयएपी गोवाचे डॉ. हर्षद कामत, डॉ. विरेंद्र गावकर व शिक्षण संचालनालयाचे अधिकारी उपस्थित होते.