गोवा खबर:दक्षिण गोवा जिल्हा दंडाधिकार्यांनी एका आदेशाद्वारे दक्षिण गोवा भागातील सर्व हॉटेल्स, इमारती, फ्लॅट्स यांच्या व इतर निवासी व्यवस्था करणार्या मालकांना आणि लॉजिंग व बोर्डिंग, शॅक्स, खासगी गेस्ट हाऊस, पेइंग गेस्ट निवास, धार्मिक संस्थांचे पेइंग गेस्ट निवास यांच्या मालकांना, तात्पुरती निवास व्यवस्था करणार्या मालकांना आपल्याकडे येणार्या ग्राहकांची ओळख पटविण्यासाठी ग्राहकांकडून मतदार ओळखपत्र, वाहन चालविण्याचा परवाना, आधार कार्ड, पासपोर्ट यासारख्या ओळखपत्रांची मागणी करावी, असे निर्देश दिले आहेत.
आणि पोलिसांतर्फे तयार करण्यात आलेल्या पथिक या सॉफ्टवेअरमध्ये ग्राहकांचे/अभ्यागतांचे तपशील भरण्यासाठी आवश्यक व्यवस्था करावी असे सांगण्यात आले आहे.
दक्षिण गोवा जिल्ह्याच्या क्षेत्रीय अखत्यारीत येणार्या कोणत्याही घराच्या/मालमत्तेच्या मालकांनी भाडेकरूंचे सदर तपशील संबंधित भागाच्या पोलीस प्रमुखाला दिल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीला कोणतीही जागा निवासासाठी देऊ नये.
तसेच भाडेकरूंची माहिती जवळच्या पोलीस स्टेशवर द्यावी. मालकांनी आपल्या ग्राहकांची आणि भाडेकरूंची माहिती जतन करून ठेवावी आणि गरज असते तेंव्हा अशी माहिती पोलीस यंत्रणेस उपलब्ध करावी.
तसेच दक्षिण गोव्यातील सर्व राष्ट्रीयीकृत बँकांच्या एटीएमच्या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षक तैनात करावेत व सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत असे निर्देश जिल्हा दंडाधिकार्यांनी बँकांच्या प्रमुखांना दिले आहेत.
हा आदेश ६ मार्च २०२३ पासून लागू झाला आहे आणि तो ६० दिवसांच्या कालावधीसाठी अस्तित्वात राहील (दोन्ही दिवसांचा समावेश). या आदेशाचे उल्लंघन भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ अंतर्गत दंडनीय आहे.