गोवा खबर:देशातील पायाभूत सुविधांच्या विकासाच्या उद्देशाने भारतीय साधनसुविधा उद्योग संघटना (एआयआय़) आणि जेके सिमेंट लिमिटेड यांच्याद्वारे बांधकाम क्षेत्रातील शिक्षणतज्ञ आणि उद्योजक यांच्यामध्ये बांधकाम क्षेत्रातील ज्ञान, नवी माहिती यांचे आदानप्रदान करण्याच्या उद्देशाने एक स्वतंत्र व्यासपीठ तयार केले आहे. १२ नोव्हेंबर २०२२ रोजी गोव्यामध्ये “टेक्नॉलॉजी ऑफ होम नॉलेज सिरीज-मास्टरक्लास” या एक तास अवधीच्या विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले.
या सत्रामध्ये गोव्यामध्ये कार्यरत असलेले स्थापत्य अभियंते तसेच वास्तुरचनाकार मोठ्या संख्येने सहभागी झाले. भारतीय साधनसुविधा उद्योग संघटना आणि जेके सिमेंट लिमिटेड यांच्या वतीने आयोजित या उपक्रमामध्ये राज्यातील स्थापत्य अभियंते आणि वास्तुरचनाकार यांचे क्षमता व कौशल्यवर्धन करण्याच्या उद्देशाने या क्षेत्रातील नवे ज्ञान, माहिती, तंत्रज्ञान सादर करण्यात आले. या सत्रामध्ये आयआयटी कानपूरचे प्राध्यापक डॉ. सुधीर मिश्रा यांनी भारतातील बांधकाम उद्योग क्षेत्राच्या विकासाबाबत तसेच या क्षेत्रातील कार्यरत व्यावसायिकांच्या कामाशी संबंधित विषयांवर मार्गदर्शन केले.
बांधकाम क्षेत्रातील विविध सिद्धांत तसेच प्रत्यक्ष अनुभव यांची सांगड कशी घालावी यासाठी मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने जेके सिमेंटच्या सहकार्याने आयोजित या मास्टरक्लासमध्ये वर्तमानातील तसेच भविष्यातील बांधकाम क्षेत्रातील बदलांचा वेध घेतला गेला. या ट्रेंडच्या माध्यमातून शाश्वत तंत्रज्ञानाच्या विकासासाठी स्थापत्य अभियांत्रिकीसाठी असलेल्या संधींवरही प्रकाश टाकण्यात आला. टी-ओ-एच मास्टरक्लामध्ये आयआयटी कानपूरचे प्राध्यापक डॉ. सुधीर मिश्रा यांनी मार्गदर्शन केले. बांधकाम पद्धतीमध्ये वेगाने होत असलेले बदल, शाश्वत विकास आणि जीवनचक्र व्यवस्थापन, न्यायवैद्यक अभियांत्रिकी, निकषवैशिष्ट्यांचे महत्व आणि इतर काही तांत्रिक विषयांबाबत त्यांनी केलेले मार्गदर्शन गोव्यातील स्थापत्य अभियंते व वास्तुरचनाकार यांच्यासाठी मोलाचे ठरणार आहे.
या उपक्रमाबाबत भारतीय साधनसुविधा उद्योग संघटनेचे विश्वस्त आणि सरसंचालक श्री. रजनीश दासगुप्ता जेके सिमेंट लि.चे समूह अध्यक्ष- विक्री व मार्केटिंग श्री. पुष्प राज सिंह म्हणाले, “स्थापत्य अभियंते विशेषतः काँक्रिट अभियंते यांच्या ज्ञान व माहिती गरजा ओळखून तसेच कार्यरत अभियंत्यांच्या कौशल्य वर्धनाच्या निकडीच्या गरजा पाहून आयआयटीमधील नामवंत शिक्षकांच्या माध्यमातून अशा मार्गदर्शन सत्रांचे खास आयोजन केले जात आहे. बांधकाम पद्धतीत वेगाने होणारे बदल, अधिकाधिक शाश्वत बांधकाम पद्धतींचा अवलंब करण्याचा दबाव, क्राँक्रिट अभियंत्याची भूमिका आणि अपेक्षा यामध्ये झालेले मोठे बदल, प्रकल्पाच्या कार्यचक्राचे व्यवस्थापन, देखभाल-दुरुस्तीमधील समस्या, रेट्रोफिटिंग, विद्यमान सुविधेचे बळकटीकरण अशा विविध विषयांवर या सत्रांमध्ये भर दिला जात आहे.”
श्री. रजनीश दासगुप्ता पुढे म्हणाले, “मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये स्थापत्य अभियंते आणि वास्तुरचनाकार यांचा सेवासहभाग निश्चितच जास्त असतो, पण जेव्हा भारतात वैयक्तिक घरांच्या बांधकामाचा प्रश्न येतो तेव्हा घरमालक अनेकदा स्थापत्य अभियंत्याच्या व्यावसायिक सेवा घेत नाहीत. अशामुळे बांधकाम संरचनेची ताकद आणि दीर्घायुष्य यावर नेहमीच प्रश्नचिन्ह उभे राहत असते. स्थापत्य अभियंता आणि वास्तुविशारद हे कोणत्याही बांधकामाचा कणा असतात हे लोकांनी समजून घेतले पाहिजे. अशा अनुभवी, व्यावसायिक सेवादात्यांना कोणत्याही बांधकामासाठी नियुक्त करणे अत्यंत आवश्यक असते. देशातील बांधकाम पद्धतीत सतत विकसित होत असलेल्या बदलांमुळे, भारतातील स्थापत्य अभियंते आणि वास्तुविशारद यांचे सतत कौशल्य व क्षमतावर्धन करत राहणे हे बांधकाम उद्योगासाठी अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे नव्या भारतासमोरील आव्हाने आणि त्यावरील उपाययोजना यावर प्रकाश
टाकण्यासाठी असोसिएशन ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर इंडस्ट्री (इंडिया) आणि जेके सिमेंट लिमिटेड यांनी “टेक्नॉलॉजी ऑफ होम नॉलेज सीरीज – मास्टरक्लास” हा उपक्रम सुरू केला आहे.”
यालाच दुजोरा देत श्री. पुष्प राज सिंह म्हणाले, “भारतातील विकास हा एका योग्य वळणावर पोचला आहे. अशा वेळी नवनवीन कल्पना असलेले, अनुभव असलेले अभियंते आणि कुशल मनुष्यबळ तंत्रज्ञान आणि शाश्वत नवनिर्मितीच्या माध्यमातून देशाच्या भविष्याला आकार देऊ शकतात. बिल्ड सेफ या आमच्या ध्येयापोटी प्रामाणिक आणि ध्यासमग्न राहत आम्ही अनेक वर्षे अथकपणे आणि ठामपणे काम करत आलो आहोत. दिसायला सुंदर असण्याबरोबरच अपेक्षित कार्यउद्दिष्टाची पूर्तता करू शकणारी शाश्वत व विश्वासार्ह रचना केवळ बिल्ड सेफ या धोरणामधूनच घडू शकतात. वेगाने बदलत असलेल्या बांधकाम क्षेत्रात पुस्तकी ज्ञान विरुद्ध व्यावहारिक ज्ञान यावर नेहमीच चर्चा होत असते. पण जेव्हा या उद्योगातील तज्ञांकडून आपण शिकतो तेव्हा एकच उत्तर मिळते असते ते म्हणजे प्रत्यक्ष कामाचा अनुभव.”
आयआयटी कानपूरचे स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक डॉ. सुधीर मिश्रा म्हणाले, “पायाभूत सुविधांची निर्मती आणि देखभालीसाठी इतर व्यावसायिकांसमवेत अभियंते आणि वास्तुरचनाकार काम करत असतात. त्यांच्या खांद्यावर असलेल्या सामाजिक जबाबदारीचे नेहमी भान राखणे जसे महत्वाचे असते तसेच व्यावसायिकदृष्ट्या स्पर्धाक्षम राहणेही त्यांच्यासाठी अपरिहार्य असते. तंत्रज्ञान, बांधकाम पद्धती, विविध कार्यघटकांमधील संबंधांवर होणारे मूलभूत व मोठे बदल यामुळे महाविद्यालयांमध्ये शिकवला जाणारा अभ्यासक्रम आपल्या व्यावसायिक गरजांची तसेच समाजाकडून होणाऱ्या मागणीची पूर्तता करण्यास पुरेसा ठरणार नाही. या स्थिती बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिकांसाठी नियमित ज्ञान व कौशल्य वर्धनाचे महत्वाबाबत जागरुकता घडवण्यासाठी हा उपक्रम एक योग्य पाऊल आहे.”