Connect with us

गोवा खबर

पूराभिलेख खात्याचे जमीन दाखल्यांचे लवकरच डिजिटलायझेशन – सुभाष फळदेसाई

Published

on

Spread the love

गोवा खबर:पुराभिलेख मंत्री श्री.सुभाष फळदेसाई यांनी पुराभिलेख खाते त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या सर्व ऐतिहासिक दस्तऐवजांचे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात रूपांतर करील अशी घोषणा केली, ज्यामुळे राज्यातील जमिनीच्या बेकायदेशीरपणे बळकावणाऱ्या जुन्या जमिनीच्या कागदपत्रांचे फसवे संपादन रोखता येईल.

संस्कृती भवन, पाटो-पणजी येथे पुराभिलेख खात्यातर्फे आयोजित मोडी-मराठी दस्तऐवजांच्या खास प्रदर्शनाचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. पुराभिलेख खात्याचे संचालक श्री. दीपक बांदेकर, पुरातत्व खात्याचे संचालक श्री . निलेश फळदेसाई यावेळी उपस्थित होते.

उपस्थितांना संबोधित करताना श्री.फळदेसाई यांनी लोकांनी हल्लीच पुराभिलेखागार खात्यांतील जमिनीची कागदपत्रे फसवणूक करून जमिनीवर मालकी हक्क सांगितला आहे. खात्याकडे उपलब्ध दस्तऐवजांचे डिजिटलायझेशन केल्यास अशा घटनांना आणखी आळा बसेल आणि राज्याची जमीन तसेच सांस्कृतिक मूल्ये आणि इतिहास यांचे रक्षण होईल असेही त्यांनी सांगितले.

मंत्र्यांनी सदर खाते ऐतिहासिक दस्तऐवजांचे डिजिटायझेशन करण्यासाठी विशेष सॉफ्टवेअर विकसित करण्याच्या प्रक्रियेत आहे असे सांगून ज्याद्वारे लोक योग्य हेतूसाठी कागदपत्रे मिळवू शकतील असे ते म्हणाले. श्री. फळदेसाई यांनी मोडी-मराठी दस्तऐवजांचे अनोखे प्रदर्शन आयोजित केल्याबद्दल पुराभिलेख खात्याच्या प्रयत्नांचे कौतुक केले. या प्रदर्शनातून तत्कालीन सामाजिक-राजकीय, सांस्कृतिक चित्रे समोर येणार आहेत. नव्या पिढीला या प्रदर्शनाचा खूप फायदा होईल असेही ते म्हणाले.

त्यांनी पूराभिलेख अभ्यासात गुंतलेल्या इतर संस्थांची मदत घेण्याचा सदर खात्याचा मानस आहे असेही सांगितले आणि सामान्य लोकांसाठी सर्व मोडी लिपी दस्तऐवजांचे भाषांतर करील. अशा जुन्या कागदपत्रांच्या भाषांतरामुळे इतिहासातील गोव्याचे योग्य चित्र समोर येईल असे ते म्हणाले. मोडी (लिपी)-मराठी दस्तऐवजांच्या प्रदर्शनात पेशवा माधवराव, इतर मराठे आणि महाराष्ट्र प्रांतातील संस्थानिकांनी पोर्तुगीज व्हाईसरॉय आणि इतर अधिकार्‍यांना जमिनीचे वाद, शांतता राखणे, पोर्तुगीज आणि मराठे यांच्यातील संबंध या विषयांवर पाठविलेल्या विविध पत्रांचा समावेश आहे. हे प्रदर्शन १६ ऑक्टोबर २०२२ पर्यंत खुले राहणार आहे.

पुरालेखतज्ञ श्री.बालाजी शेणॉय यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. सहाय्यक पुरालेखतज्ञ श्रीमती. कृतिका सावंत यांनी आभार मानले.