गोवा खबर: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांच्यासह नवीन भाजप नवे आमदार दिगंबर कामत आणि आलेक्स सिक्वेरा यांनी गोव्यातील विविध किनार्यांवरून गोळा केलेल्या प्रचंड कचऱ्याने समुद्रकिनारे स्वच्छता कंत्राट हा घोटाळा असल्याचा काँग्रेस पक्षाचा दावा परत एकदा खरा ठरला आहे असे काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी म्हटले आहे.
मी दिगंबर कामत आणि आलेक्स सिक्वेरा या नवीन भाजप आमदारांना विनंती करतो की त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे समुद्रकिनारे स्वच्छता कंत्राच रद्द करण्याची आणि राज्याचे जवळपास ६० कोटी वाचवण्याची मागणी करावी, असे अमित पाटकर यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, पर्यटन मंत्री रोहन खंवटे, भाजपा अध्यक्ष सदानंद तानावडे यांच्यासह इतरांनी गोव्यात “क्लीन कोस्ट, सेफ सी” मोहिमेसाठी विविध किनार्यांवरून प्रचंड कचरा गोळा केल्याचे धक्कादायक दृष्य आज गोमंतकीयांनी पाहिले. यावरून सरकारने नियुक्त केलेले समुद्रकिनारा सफाई कंत्राटदार काहीही करत नसल्याचे सिद्ध होते, असे अमित पाटकर यांनी नमूद केले.
गोवा लोकायुक्तांनी राम क्लीनर्स अँड डेव्हलपर्स आणि भूमिका क्लीनटेक सर्व्हिसेस या दोन कंत्राटदारांकडुन झालेल्या किनारे सफाई घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर दृष्टी लाईफसेव्हिंगला दिलेल्या कंत्राटातही असाच घोटाळा झाल्याचे आढळून आले होते. सध्याचा कर्नाटक इंडस्ट्रीयल अँड कमर्शियल हा ठेकेदार कोणतेही काम करत नसल्याने गोव्यातील विविध समुद्रकिनाऱ्यांवर कचऱ्याचे ढीग साचले आहेत व त्यामुळेच आज सगळीकडे कचरा गोळा झाला, असे अमित पाटकर यांनी निदर्शनास आणून दिले.
मी मुख्यमंत्र्यांना आवाहन करतो की दर आठवड्याला अशा प्रकारच्या मोहिमेचे आयोजन करावे आणि स्थानिक पंचायतींना समुद्रकिनारा स्वच्छतेच्या कामात सहभागी करून घ्यावे. ते काम प्रभावीपणे करतील आणि आमचे किनारे देखील स्वच्छ राहतील. भाजप सरकारने आपले ‘मिशन ३० टक्के कमिशन’ पूर्ण करण्यासाठी मुंबईतील दोन कंत्राटदारांची नियुक्ती करण्यापूर्वी आमचे गोव्याचे कंत्राटदार वर्षाला केवळ ३ कोटी रुपये घेवून किनारे स्वच्छ करण्याचे काम करत होते, याची आठवण अमित पाटकर यांनी मुख्यमंत्र्यांना करुन दिली आहे.