– 2022-23 हंगामपूर्व शिबिरामध्ये खेळाडूंसह मुख्य प्रशिक्षक कार्लोस पेना केंद्रस्थानी
गोवा खबर : एफसी गोवा क्लबच्या 2022-23 आयएसएल तयारीला शुक्रवारपासून साल्वॅडोर डो मुंडो पंचायत फुटबॉल ग्राउंडवर सुरुवात झाली. चार महिन्यांच्या विश्रांतीनंतर मैदानात उतरलेल्या फुटबॉलपटूंना पाहण्यासाठी यावेळी चाहत्यांनी मोठी गर्दी केली. गौर्स या हंगामपूर्व शिबिरामध्ये खेळाडूंसह नवनियुक्त मुख्य प्रशिक्षक कार्लोस पेना केंद्रस्थानी आहेत.
सर्व खेळाडू फिजिकली फिट राहावेत. तसेच सांघिक खेळ उंचावण्यादृष्टीने आणि डावपेच आखण्यादृष्टीने या हंगामपूर्व शिबिराला खूप महत्त्व आहे. खेळाडूंना एकसंघ ठेवतानाच एक स्ट्राँग ग्रुप तयार करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे एफसी गोवाचे मुख्य प्रशिक्षक कार्लोस पेना यांनी यावेळी सांगितले. या शिबिराद्वारे पुढील हंगामासाठी आम्ही करारबद्ध केलेल्या नव्या खेळाडूंना जुन्या खेळाडूंशी जुळवून घेणे, सोपे जाईल, असे पेना पुढे म्हणाले. ड्युरँड कप स्पर्धेत खेळत असलेल्या फर्स्ट टीममधील चार खेळाडूंव्यतिरिक्त सर्व फुटबॉलपटूंची उपस्थिती हंगामपूर्व शिबिरामध्ये आहे.

साल्वॅडोर डो मुंडो पंचायत फुटबॉल ग्राउंडवरील प्रेक्षकांची उपस्थिती आणि त्यांची एक्सायटमेंट याबाबत पेना म्हणाले की, हंगामपूर्व शिबिर आणि चाहत्यांची उपस्थिती हे चित्र अनेकदा पाहायला मिळते. यानंतर आम्ही पिचवर ट्रेनिंग सुरू करणार आहोत. आमचे सर्व खेळाडू शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम आहेत. त्यांच्यात खूप उर्जा आहे आणि सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी उत्सुक आहेत. हीच एनर्जी आणि फिटनेस ते संपूर्ण हंगामात कायम ठेवतील, असा विश्वास कालार्र्ेस पेना यांनी व्यक्त केला आहे.
शिबिरात दाखल झालेल्या मिडफिल्डर ग्लॅन मार्टिन्सची उपस्थिती लक्षणीय ठरली. गौर्सच्या सहकार्यांसोबत पुन्हा खेळता आल्याबद्दल त्याने आनंद व्यक्त केला आहे. एफसी गोवाकडून पुन्हा खेळण्याचा अनुभव अवर्णनीय आहे. मागील हंगामात कोरोनामुळे खेळाडूंना बायो-बबल अनेक महिने घालवावे लागले. त्यानंतर आम्ही ब्रेकचा आनंद लुटला. आता पुन्हा खेळाकडे लक्ष केंद्रित करत आहोत. त्यादृष्टीने ट्रेनिंग महत्वाची आहे, असे त्याने म्हटले.