Connect with us

गोवा खबर

विद्यार्थी परिषद गोवा विभाग द्वारे “एक गाव एक तिरंगा” राज्यभर साजरा

Published

on

Spread the love

गोवा खबर:अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या गोवा विभागने राज्यातील विविध सामाजिक महत्त्वाच्या ठिकाणी भारतीय तिरंगा फडकवून स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी केली. पेडणेपासून काणकोणपर्यंत सर्व तालुक्यांतील अभाविप गोव्याच्या विद्यार्थी कार्यकर्त्यांनी स्थानिक ग्रामस्थ आणि विद्यार्थी समुदायाला तिरंगा फडकवण्यासाठी एकत्र येण्यास प्रवृत्त केले. यादरम्यान आपल्या स्वातंत्र्यलढ्यातील अज्ञात झालेल्या वीरांचेही स्मरण करण्यात आले आणि त्यांच्या शौर्याच्या गाथा लोकांना सांगितल्या गेल्या.

ध्वजारोहणानंतर सामूहिकपणे राष्ट्रगीत, भारत माता पूजन व सांस्कृतिक कार्यक्रम करण्यात आले. या कार्यक्रमांचा उद्देश आपल्या राज्यातील आणि देशातील जनतेमध्ये देशभक्तीची भावना जागृत करणे हा आहे. अभाविपचे पश्चिम क्षेत्रीय संघटन मंत्री श्री. देवदत्त जोशी म्हणाले, “आपल्या देशाच्या स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी करत असताना आपण या दिवसाचा एक भाग आहोत याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. हे स्वातंत्र्य आपल्याला सहज मिळालेले नाही, हे आपल्या शूर स्वातंत्र्य सैनिकांच्या पराक्रमाचे फळ आहे, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे.”

अभाविप उत्तर गोवा एक गाव एक तिरंगा अभियानाचे प्रमुख, सुदिप नाईक म्हणाले, “भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याचा लोकांचा उत्साह अप्रतिम आहे. ध्वजारोहणासाठी लोकांना प्रेरित करण्यात आणि ध्वजसंहितेची जाणीव निर्माण करण्यात अभाविपने मोठी भूमिका बजावली आहे. देशभरात आपल्या लोकांची एकता पाहून खूप आनंद होतो.” अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ने वर्षभर अशा विशेष कार्यक्रमांचे आयोजन सुरू ठेवण्याची योजना आखली आहे जेणेकरून देशवासीयांना या राष्ट्रीय सणाचा भाग बनण्याची पुरेशी संधी मिळेल.