गोवा खबर: गोवा श्रमिक पत्रकार संघटनेतर्फे (गुज) लोकमान्य टिळक यांना त्यांच्या पुण्यतिथीदिनी श्रद्धांजली वाहिली. कामगार आयुक्त राजु गांवस या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
गुजच्या पाटो पणजी येतील श्रमशक्ती भवनातील कार्यालयात आयोजित या कार्यक्रमाला कामगार आयुक्त गावस यांनी टिळकांच्या पत्रकारितेविषयी माहिती देताना त्यांनी त्या काळी पेललेल्या आव्हानांचा उल्लेख केला. कणखर पत्रकारीता करताना टिळकांनी तत्वांशी कशी तडजोड केली नाही आणि त्यासाठीच्या परिणामालाही सामोरे जायची कशी तयारी ठेवली याची माहिती त्यांनी दिली. त्यांचे योगदान केवळ पत्रकारितेपुरते मर्यादीत न ठेवता बंगालच्या फाळणीला कडाडून विरोध करताना लाला लजपतराय, बिपिंनचंद्र पाल यांच्या खांद्याला खांदा लावून संपूर्ण देश पेठविताना इंग्रज सरकारला निर्णय मागे घेण्यास भाग पाडल्याचे त्यांनी सांगितले. गोव्यातील पत्रकारांच्या तक्रारी वेळोवेळी सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केल्याचे ते म्हणाले. ९० टक्के तक्रारीत पत्रकारांना न्याय मिळवून देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
सुरूवातीला लोकमान्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून आणि दीप प्रजल्वीत करून या कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. गुजचे अध्यक्ष राजतिलक नाईक यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सरचिटणीस वासुदेव पागी यांनी सूत्रसंचालन तर खजिनदार कैलास नाईक यांनी आभार मानले.