गोवा खबर: नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार सचिव श्री संजीत रॉड्रिग्स आय़एएस यांनी ग्राहक जितके जागरूक असतील तितकेच ते ग्राहकांसाठीच नाही तर समाजासाठी आणि राज्यासाठी चांगले आहे असे सांगून एक समुदाय म्हणून आपली वाढ व्हायला पाहिजे असे प्रतिपादन त्यांनी केले.
अन्न व औषध प्रशासन संचालनालयातर्फे रवींद्र भवन मडगाव येथे आयोजित राज्य ग्राहक हक्क दिन समारंभात श्री रॉड्रिग्स बोलत होते.
पुढे बोलताना त्यांनी एक व्यक्ती म्हणून लाभ मिळवू नये तर संपूर्ण समाजाला एक परिसंस्था म्हणून लाभ मिळायला हवा असे सांगितले. चांगल्या नाविन्यपूर्ण कल्पना आणि चांगले कार्यक्रम आखावेत असे आवाहन त्यांनी ग्राहक क्लबाना केले. ग्राहकांच्या कोणत्याही समस्येचे निराकरण करणे आवश्यक आहे. ग्राहक चळवळीत निवारण हा मुख्य घटक आहे. त्यांनी लोकांकडून सूचनां मागविल्या आहेत.
ग्राहक जागृती चळवळीत विद्यार्थी आणि शिक्षक यांची मोठी भूमिका आहे आणि ते सरकार आणि समाज यांच्यातील संवादाचे प्रभावी माध्यम बनू शकतात असे मत श्री रॉड्रिग्स यांनी व्यक्त केले.

श्री रॉड्रिग्स यांनी सलग चौथ्या वर्षी भारतातील अन्न सुरक्षा निर्देशांकावर राज्याला सर्वोत्कृष्ट राज्य म्हणून गौरव प्राप्त करण्यासाठी पाऊल पुढे टाकल्याबद्दल एफडीएची प्रशंसा केली. आणि ही काही छोटी कामगिरी नाही कारण ती मिळविण्यासाठी खूप पाठपुरावा, कृती आणि जनजागृती करावी लागते असे ते म्हणाले. हा दर्जा टिकवून ठेवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. रँक मिळवणे सोपे असते पण सातत्य राखणे फार कठीण असते. राज्याने स्वतःशीच स्पर्धा करून पुढे जाण्याची वेळ आली आहे असे ते म्हणाले.
ग्राहक जागृती चळवळीशी संबंधित असलेल्या सर्व संबंधितांना त्यांनी उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले आणि या चळवळीला सरकारच्या सहकार्याचे आश्वासन दिले.
ग्राहक जागृती चळवळीला मार्गदर्शनाची गरज असून ते उपलब्ध करून देण्यात येणार असून सरकार प्रशिक्षण आणि मार्गदर्शनाला प्राधान्य देत असल्याचे ते म्हणाले. तळागाळातील जागरुकता उपक्रमांसाठी निधीची तरतुद करण्यात आली आहे जेणेकरून ग्राहक मंच आणि क्लब त्यांच्यापर्यंत पोहोचतील आणि लोकांना त्यांच्या ग्राहक हक्कांबद्दल जागरूक करतील असे ते म्हणाले.
श्री रोलँड मार्टिन्स यांनी विद्यार्थ्यांना “जागो ग्राहक जागो” घोषवाक्य खऱ्या रीतीने दिसावे यावर भर देताना सांगितले की तरुण नागरी आणि ग्राहक चळवळीचा एक भाग म्हणून राज्यात शाळा, उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयांमध्ये १४० ग्राहक क्लब आहेत असे सांगितले.
श्रीमती ज्योती सरदेसाई यांनी आपल्या स्वागतपर भाषणात अधिकार, कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या एकबरोबर व्हायला पाहिजेत. या कार्यक्रमाचा उद्देश ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा आहे असे त्या म्हणाल्या.
यावेळी मडगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री रोहित कदम उपस्थित होते.
मुरगाव व सासष्टी तालुक्यातील शैक्षणिक संस्थांच्या ग्राहक क्लबांचे प्रतिनिधी आणि ग्राहक मंचाचे स्वयंसेवक या कार्यक्रमाला उपस्थित होते.
श्री रिचर्ड नोरोन्हा यांनी आभार मानले.