Connect with us

गोवा खबर

गोवा किनारपट्टीवर ‘सी व्हिजिल 2026’ या किनारी सुरक्षा सरावासाठी नौदल आणि राज्य यंत्रणा सज्ज

Published

on

Spread the love

गोवा खबर:भारतीय नौदल आणि राज्य तसेच केंद्र सरकारच्या प्रमुख यंत्रणांकडून द्वैवार्षिक देशव्यापी किनारी संरक्षण सराव ‘सी व्हिजिल 2026’ आयोजित करण्यात येणार असून  येत्या आठवडाभरात गोव्याच्या किनारपट्टीवर सागरी सुरक्षा विषयक हालचालींना वेग येणार आहे.

आज (12 नोव्हेंबर) आयएनएस गोमंतक येथील परिषद सभागृहात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना माहिती देताना गोवा नौदल क्षेत्र मुख्यालयाचे कॅप्टन जेम्स जॉन यांनी सांगितले की, भारतीय नौदलाच्या नेतृत्वाखाली सर्व किनारी राज्यांमध्ये एकाच वेळी हा सराव आयोजित केला जात आहे. 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यांनंतर लागू करण्यात आलेल्या किनारी सुरक्षा उपाययोजनांची पडताळणी करण्यासाठी 2018 मध्ये या सरावाची संकल्पना मांडण्यात आली होती. नौदलाच्या प्रमुख थिएटर स्तरावरील सज्जता आणि युद्धसराव मोहिमेच्या पूर्वतयारीचा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे.

या सरावात भारतीय तटरक्षक दल, किनारी सुरक्षा पोलीस, सीमाशुल्क विभाग, मुरगाव बंदर प्राधिकरण, मत्स्यव्यवसाय विभाग, गुप्तचर विभाग आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) यांसह विविध यंत्रणांचा सहभाग आहे.

कॅप्टन जॉन यांनी पुढे सांगितले की, हा सराव दोन टप्प्यांत विभागण्यात आला आहे. सध्या सुरू असलेला पहिला टप्पा म्हणजे किनारी संरक्षण आणि सुरक्षा सज्जता मूल्यमापन (सीडीएसआरई) हा 9 नोव्हेंबरपासून सुरू झाला असून 17 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. या कालावधीत सहभागी यंत्रणांचे प्रतिनिधित्व करणारी प्रत्येकी 8 सदस्यांची दोन संयुक्त पथके उत्तर आणि दक्षिण गोव्यातील सुरक्षा आणि कार्यात्मक सज्जतेची पाहणी करत आहेत. या पाहणीमध्ये मासळी उतरवण्याची केंद्रे, किनारी पोलीस ठाणी, मोठी आणि लहान बंदरे, संवेदनशील क्षेत्रे आणि संवेदनशील ठिकाणे (व्हीए/व्हीपी), सीमाशुल्क कार्यालये आणि दीपगृहे यांचा समावेश आहे.

18 आणि 19 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या दोन दिवसीय सामरिक टप्प्यात या सरावाला अधिक वेग येईल. या टप्प्यात जहाजे, नौका, विमाने आणि मनुष्यबळ प्रत्यक्ष तैनात केले जाणार आहे. गोव्याच्या किनारपट्टीवरील प्रत्यक्ष परिस्थितीत प्रतिसाद देण्याच्या क्षमतेची चाचणी घेण्यासाठी सुरक्षा दलांची ‘रेड फोर्स’ या आक्रमक आणि ‘ब्लू फोर्स’ या बचावात्मक अशा दोन गटांत विभागणी केली जाईल.

या टप्प्यात दहशतवाद्यांकडून मासेमारी नौकांचा ताबा घेऊन किनाऱ्यावर उतरणे, महत्त्वाच्या किनारी आस्थापनांवर गुप्तपणे हल्ले करणे, बंदरांच्या हद्दीजवळ व्यापारी जहाजांचे अपहरण करणे आणि ड्रोन हल्ले अशा काल्पनिक धोक्यांना तोंड देण्याचा सराव सुरक्षा कर्मचारी करतील. या सरावात तटरक्षक दलाच्या जहाजांवर भारतीय नौदलाच्या हेलिकॉप्टरची कार्यवाही तसेच बंदर सुरक्षेशी संबंधित विविध आपत्कालीन परिस्थितींचाही समावेश असेल.

सी व्हिजिल 2026 चा मुख्य उद्देश संपूर्ण किनारी संरक्षण यंत्रणा एकाच वेळी कार्यान्वित करणे, तांत्रिक माहितीची देवाणघेवाण करणाऱ्या प्रणालींची चाचणी घेणे आणि सुरक्षा व्यवस्थेतील विद्यमान त्रुटी दूर करून गोव्याच्या सागरी सीमांचे संरक्षण अधिक मजबूत करणे हा आहे, असे कॅप्टन जॉन यांनी नमूद केले. परिषदेनंतर नौदलाच्या अधिकाऱ्यांनी खोल समुद्रातील भागात आयोजित केलेल्या प्रात्यक्षिक सरावाचे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना दर्शन घडवले.