Connect with us

गोवा खबर

मराठी टिकवण्यासाठी गोव्याची दुसरी राजभाषा होणे हाच शेवटचा पर्याय : वेलिंगकर

Published

on

Spread the love

सरकारकडून मराठी भाषेचे खच्चीकरण होत असल्याचा आरोप; मडगावातील मराठीप्रेमींच्या बैठकीत मराठीला राजभाषेचा दर्जा देण्याची मागणी

गोवा खबर :गोव्यात मराठी भाषेचे अस्तित्व टिकवण्यासाठी मराठीला दुसऱ्या राजभाषेचा दर्जा मिळणे आवश्यक आहे. सध्याच्या सरकारने मराठी शाळा, त्यांचे अनुदान आणि सरकारी नोकऱ्यांमधील मराठी भाषेचे स्थान कमकुवत केले आहे. त्यामुळे मराठीच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला असून मराठीप्रेमींनी एकत्र येऊन याविरोधात लढा उभारला पाहिजे, असे आवाहन मराठी राजभाषा निर्धार समितीचे निमंत्रक प्राचार्य सुभाष भास्कर वेलिंगकर यांनी केले.

मराठी राजभाषा निर्धार समितीतर्फे घोगळ, मडगाव येथील तीन कात्री राखणदार मंदिरात आयोजित मराठीप्रेमींच्या बैठकीत ते बोलत होते.

वेलिंगकर म्हणाले की, गोव्यात पूर्वजांपासून बोलण्यासाठी कोंकणी, तर शिक्षण, वाचन, लेखन आणि दस्तऐवजांसाठी मराठी भाषेचा वापर करण्याची परंपरा आहे. कोंकणीला राजभाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल कोणतेही वैषम्य नाही. मात्र, गोव्याच्या धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनाशी जोडलेली मराठी भाषा डावलली गेल्याची खंत आहे.

सरकारवर मराठीविरोधी धोरणाचा आरोप

सध्याच्या सरकारने मराठी शाळा आणि त्यांच्या अनुदानाचे खच्चीकरण केले. त्यानंतर सरकारी नोकऱ्यांमधून मराठी भाषेला पूर्णपणे वगळून मराठीवर मोठा आघात केला आहे, असा आरोप वेलिंगकर यांनी केला.

येत्या २० वर्षांत नागालँडप्रमाणे गोव्यातूनही मराठी भाषेचे संपूर्ण उच्चाटन करण्याच्या कारस्थानाचा हा भाग असल्याचा दावा त्यांनी केला. हे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी मराठीप्रेमींनी संघटित होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

मडगाव पुन्हा मराठी संस्कृतीचे केंद्र बनावे

एकेकाळी मराठी संस्कृतीचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मडगावला पुन्हा मराठी भाषेचे आणि संस्कृतीचे प्रमुख केंद्र बनविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत, असे वेलिंगकर यांनी सांगितले.

मराठी साहित्य आणि संस्कृतीच्या जडणघडणीत मडगावचे मोठे योगदान आहे. गोमंत विद्यानिकेतन आणि मठग्रामस्थ हिंदू सभा यांसारख्या संस्था आजही या समृद्ध परंपरेची साक्ष देतात. त्यामुळे मडगावचे मराठी सांस्कृतिक वैभव पुन्हा उभे करण्यासाठी सर्वांनी कामाला लागावे, असे आवाहन त्यांनी केले.

मराठी राजभाषा चळवळीच्या १९ महिन्यांच्या कार्याचा आढावा

या बैठकीला मडगाव प्रखंड समितीचे अध्यक्ष दयानंद पांडुरंग चोडणकर, दक्षिण गोवा संघचालक अभय खंवटे आणि मातृशक्तीप्रमुख तथा साहित्यिक पौर्णिमा देसाई व्यासपीठावर उपस्थित होते.

बैठकीच्या प्रारंभी प्रखंड समन्वयक जगदीश नाईक यांनी उपस्थितांचे स्वागत केले. मराठी राजभाषा निर्धार समितीने गेल्या १९ महिन्यांत राबविलेल्या विविध उपक्रमांचा त्यांनी आढावा घेतला. तसेच उपस्थित मान्यवरांचा परिचय करून दिला.

दामोदर पुराणिक यांनी आभार मानले. सामूहिक पसायदानाने बैठकीची सांगता झाली.