Connect with us

गोवा खबर

गोव्यात 12 व्या जागतिक कर्णबधिर महासंघ आशिया प्रादेशिक सचिवालय युवा शिबिराचे उद्घाटन

Published

on

Spread the love

नेतृत्व आणि सक्षमीकरणाच्या उद्देशाने आशियातील कर्णबधिर युवा नेते आले एकत्र

गोवा खबर:गोव्यात आज 12 व्या जागतिक कर्णबधिर महासंघ आशिया प्रादेशिक सचिवालयाच्या युवा शिबिराचे उद्घाटन झाले. नेतृत्व विकास, अध्ययन, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि परस्पर संपर्क विस्तार ही या पाच दिवसीय शिबिराची उद्दिष्टे आहेत. यानिमित्ताने आशियातील युवा कर्णबधिर नेते आणि प्रतिनिधी एकत्र आले आहेत.

गोवा खबर:गोव्याचे दिव्यांगजन सक्षमीकरण मंत्री सुभाष फळदेसाई या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. गोव्याचे राज्य दिव्यांगजन आयुक्त कार्यालय आणि दिव्यांगजन सक्षमीकरण विभागाच्या वतीने, तसेच ऑल इंडिया फेडरेशन ऑफ द डेफ आणि गोवा असोसिएशन ऑफ द डेफ यांच्या सहकार्याने या युवा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिरातील विविध उपक्रमांसाठी भारत, दक्षिण कोरिया, जपान, थायलंड, इंडोनेशिया, भूतान, नेपाळ, फिलीपिन्स, मंगोलिया आणि लाओस यासह सुमारे 10 देशांतील प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.

हे युवा शिबिर 5 ते 9 ऑक्टोबर दरम्यान चालणार असून, या शिबिरात सहभागी झालेल्या युवा कर्णबधिर प्रतिनिधींसाठी नेतृत्व, आपले मत मांडणे, संवाद, सांस्कृतिक देवाणघेवाण, परस्पर संपर्क विस्तार आणि ज्ञानाची देवाणघेवाण या विषयांवरील विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या युवा शिबिराचा सांगता समारंभ 9 ऑक्टोबर रोजी होणार आहे.

यावेळी गोव्याचे दिव्यांगजन सक्षमीकरण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी उपस्थितांना संबोधित केले. युवा हे केवळ उद्याचे नेते नसून आजचेही महत्त्वाचे नेते आहेत असे ते म्हणाले. या कार्यक्रमासाठी आलेल्या प्रत्येकाने परस्परांशी संवाद साधावा, आपले अनुभव सामायिक करावेत, इतर देशांतील प्रतिनिधींसोबत मैत्रीचे नाते निर्माण करावे आणि या सगळ्यातून, आपल्या समुदायात परतत असताना नवीन कल्पना तसेच अधिक आत्मविश्वासाने परतावे यासाठीही त्यांनी उपस्थितांना प्रोत्साहन दिले. दिव्यांग व्यक्तींनी त्यांच्या जीवनावर परिणाम करणारी धोरणे आणि निर्णयांना आकार देण्यात सक्रिय सहभाग घेतला पाहिजे असेही ते म्हणाले.

गोव्याच्या पर्पल फेस्टचा या सोहळ्याचा संदर्भही त्यांनी दिला. दिव्यांग व्यक्ती, सरकार, संस्था आणि मोठ्या प्रमाणात समाजाला एकत्र आणण्याचा गोवा राज्य सरकारचा अनुभवही त्यांनी उपस्थितांसमोर मांडला. सर्वसमावेशकता केवळ धोरणापुरती मर्यादित नसावी, तर त्याचा प्रत्यक्ष समाज, सार्वजनिक जागा आणि दैनंदिन जीवनात अनुभव आला पाहिजे असे ते म्हणाले.

गोव्याचे दिव्यांगजन आयुक्त गुरुप्रसाद पावसकर यांनीही उपस्थितांशी संवाद साधला. या शिबिरासाठी गोव्यात आलेल्या सर्व प्रतिनिधींचे त्यांनी स्वागत केले. हे युवा शिबिर म्हणजे अध्ययन, मैत्री, नेतृत्व आणि नवीन शक्यतांचे व्यासपीठ असल्याचे ते म्हणाले.

युवा कर्णबधिर व्यक्तींनी आपल्या समाजाचे भविष्य घडवण्यात सक्रिय भूमिका बजावली पाहिजे असे आवाहनही त्यांनी केले. सांकेतिक भाषा, शिक्षण, रोजगार, वावर सुलभता आणि समान सहभागाच्या महत्त्वावरही त्यांनी आपल्या संबोधनातून भर दिला.

गोव्यात 5 ते 11 ऑक्टोबर 2026 दरम्यान व्यापक स्वरूपात डेफ एशिया संघटनेच्या वतीने प्रादेशिक पातळीवर व्यापक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हे युवा शिबिर याच व्यापक उपक्रमाचा एक भाग आहे. याअंतर्गत 10 आणि 11 ऑक्टोबर रोजी चार प्रमुख प्रादेशिक परिषदा आणि प्रतिनिधी बैठकांचे आयोजन होणार आहे. यात 38 वी जागतिक कर्णबधिर महासंघ आशिया प्रादेशिक सचिवालय प्रतिनिधी बैठक, 15 वी जागतिक कर्णबधिर महासंघ आशिया प्रादेशिक सचिवालय युवा विभाग प्रतिनिधी बैठक, पहिली जागतिक कर्णबधिर महासंघ आशिया प्रादेशिक सचिवालय महिला विभाग प्रतिनिधी बैठक आणि जागतिक सांकेतिक भाषा दुभाषी महासंघ परिषद अशा उपक्रमांचा अंतर्भाव आहे. या कार्यक्रमांअंतर्गत कर्णबधिर नेतृत्व, युवा आणि महिलांचा सहभाग, सांकेतिक भाषा, दुभाष्यांचा व्यावसायिक तज्ज्ञतेच्या पातळीवर विकास आणि आशियातील कर्णबधिर संस्थांमधील सहकार्य अधिक दृढ करण्यावर भर दिला जाणार आहे.

11 ऑक्टोबर रोजी, बार्देझ कोस्टल रोटरी क्लबच्या सहकार्याने, सकाळी मिरामार सर्कलपासून 3 किमी, 5 किमी आणि 7 किमी अशा अंतरांवरील गटांमध्ये एका सर्वसमावेशक धावण्याच्या स्पर्धेचे आयोजन केले जाईल. या उपक्रमाचा उद्देश क्रीडा आणि सार्वजनिक जीवनात दिव्यांग व्यक्तींच्या समान सहभागाला प्रोत्साहन देणे आणि समाजात व्यापकपणे सर्वसमावेशकतेचा उत्सव साजरा करण्यास प्रोत्साहन देणे हा आहे.

डेफ एशिया प्रादेशिक कार्यक्रमांचा समारोप आणि समापनाचा सोहळा कार्यक्रम 11 ऑक्टोबर रोजी लोक भवन येथे आयोजित केला जाईल, ज्यामध्ये आठवडाभर चाललेल्या कार्यक्रमाच्या शेवटी सर्व सहभागी आणि प्रतिनिधी एकत्र येतील.

गोवा सरकारने भारत आणि आशियाभरातील सर्व सहभागींचे जिव्हाळ्याने हार्दिक स्वागत केले असून, कर्णबधिर नेतृत्व, सुलभता, सर्वसमावेशकता आणि समान सहभाग बळकट करण्यासाठी आपली वचनबद्धता व्यक्त केली आहे.

डेफ एशियाच्या प्रादेशिक कार्यक्रमांचा उद्देश अधिक मजबूत नेटवर्क, नवीन सहयोग आणि जिथे प्रत्येक कर्णबधिर व्यक्तीला संवाद साधण्याची, सहभागी होण्याची, नेतृत्व करण्याची आणि योगदान देण्याची संधी मिळेल;अशा भविष्यासाठी नव्याने वचनबद्धता निर्माण करणे हा आहे.