Connect with us

गोवा खबर

गोव्याच्या विकासासाठी एकजुटीने काम करूया: खवंटे

Published

on

Spread the love


गोवा खबर:पर्यटन, माहिती आणि तंत्रज्ञानमंत्री श्री रोहन खवंटे यांनी सरकार गोव्याच्या विकासासाठी कटिबद्ध असून गोव्याच्या सांस्कृतिक मूल्यांचे रक्षण करण्यासही कटिबद्ध असल्याचे सांगितले.


आज म्हापसा येथे भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यानिमित्त राष्ट्रध्वज फडकवल्यानंतर ते बोलत होते.
नुकत्याच गोव्यात आयोजित केलेल्या शॅकटॉनचे उदाहरण देताना श्री खवंटे यांनी  गोव्याकडे आता नवोन्मेष आणि तंत्रज्ञानाचे केंद्र म्हणून पाहिले जात असल्याचे सांगितले.


त्यांनी नवनिर्मात्यांना गोव्यात येण्याचे आवाहन केले त्यामुळे राज्यातील स्टार्टअप पध्दतीला मोठी मदत होईल जी गोव्यातील लोकांना, विशेषतः तरुण आणि महिलांना रोजगार मिळविण्यासाठी, रोजगार देणारे बनण्यासाठी आणि सक्षम होण्यासाठी मदत करील असे ते म्हणाले.  



राज्यातील अधिक सेवांचे डिजिटायझेशन करण्यासाठी सरकार गोवा फायबर नेटवर्क प्रकल्पावर काम करीत आहे ज्यामुळे सरकारी सेवांमध्ये गती आणि पारदर्शकता आणण्यास मदत होईल अशी त्यांनी माहिती दिली.

श्री खवंटे यांनी    खाण कामावरील बंदीनंतर राज्याच्या अर्थव्यवस्थेला स्थैर्याकडे नेण्यात पर्यटन क्षेत्राने महत्त्वाची भूमिका बजावली आहे आणि याचे श्रेय त्यांनी एक खिडकी आणि व्यवसाय सुलभता मॉडेलला दिले.
गोव्याच्या पर्यटन खात्याने संस्कृती, अध्यात्म इत्यादींवर भर दिल्यामुळे पर्यटनात विविधता आली आहे, अधिक संधी निर्माण झाल्या आहेत आणि गोवा वर्षभर पर्यटनाचे ठिकाण बनले आहे असे त्यांनी सांगितले .

सरकार पुनरुत्पादक आणि आध्यात्मिक पर्यटन, आरोग्य पर्यटन इत्यादींवर लक्ष केंद्रित करून पर्यटन क्षेत्र मजबूत करण्यासाठी सातत्याने काम करीत आहे. सरकार  तरूणांसाठी पर्यटक मार्गदर्शक प्रमाणित अभ्यासक्रम सुरू करणार आहे ज्यामुळे त्यांच्या रोजगाराच्या संधी वाढतील असे त्यांनी सांगितले.

पायाभूत सुविधांचा विकास अर्थव्यवस्थेला चालना देण्यास मदत करीत आहे, असे ते म्हणाले.  झुवारी पुलांवरील उड्डाणपूल यांसारख्या पायाभूत सुविधा, मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि मांडवी आणि जुवारी पूलावरील उड्डान पूल प्रवासाचे अंतर कमी होण्यास कशी मदत होत आहे यावर त्यांनी प्रकाश टाकला. पर्वरी येथील उड्डान पूल या वर्षाच्या सप्टेंबर महिन्यात सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

श्री खवंटे यांनी सर्वांना गोव्याच्या प्रगतीसाठी एकजुटीने काम करण्याचे आणि राज्य व देशाला एक आदर्श स्थान बनविण्यासाठी आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेल्या बलिदानाचा स्मरण करण्याचे आवाहन केले.
या प्रसंगी, स्टार्टअप्सच्या संस्थापकांसह विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय सेवा बजावलेल्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री पुंडलिक खोर्जुवेंकर, उपजिल्हाधिकारी श्री अनंत मलिक, श्री विनायक चारी, बार्देशचे मामलेदार, कृष्णा गावस, एसपी विश्वेश कर्पे, पीआय म्हापसा, श्री नवीन देसाई व इतर उपस्थित होते.