Connect with us

गोवा खबर

“भाजपची उमेदवारी मलाच मिळेल” – आमदार प्रवीण आर्लेकर

Published

on

Spread the love

ओशाळबाग, धारगळ येथे भाजपची कोपरा बैठक

गोवा खबर: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पेडणे मतदारसंघातील ओशाळबाग, धारगळ येथे भाजपच्या वतीने प्रथमच कोपरा बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीला स्थानिक कार्यकर्ते, महिला व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

यावेळी बोलताना पेडणे मतदारसंघाचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपची अधिकृत उमेदवारी आपल्यालाच मिळेल, असा ठाम विश्वास व्यक्त केला. निवडणुका जवळ आल्या की अनेक जण अळंब्यांसारखे उगवतात, विविध आश्वासने देतात आणि आपणच भाजपचे उमेदवार असल्याचा दावा करतात. अशा भूलथापांना मतदारांनी बळी पडू नये, असे आवाहन त्यांनी केले.

आर्लेकर म्हणाले की, राज्य आणि केंद्रातील भाजप सरकारच्या माध्यमातूनच पेडणे मतदारसंघाचा सर्वांगीण विकास शक्य झाला आहे. विकासासाठी दूरदृष्टी आवश्यक असून ती भाजप सरकारकडे आहे. मतदारसंघात सुरू असलेल्या विकासकामांची माहिती समाजमाध्यमे आणि वृत्तपत्रांद्वारे जनतेपर्यंत पोहोचत आहे. विरोधकांनी केवळ टीका न करता मतदारसंघाच्या हितासाठी विधायक सूचना कराव्यात, असेही त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, निवडणुकीच्या तोंडावर विविध आश्वासने देणाऱ्या नेत्यांनी मागील साडेचार वर्षांत काय काम केले, याचा जनतेने विचार करावा. जे लोक सतत जनतेच्या संपर्कात राहून काम करतात, अशांनाच मतदारांनी संधी द्यावी. पेडणे मतदारसंघातील उर्वरित विकासकामेही पूर्ण करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

मोपा विमानतळावरील नोकऱ्यांबाबत विरोधकांवर टीका

मोपा विमानतळाच्या मुद्द्यावर बोलताना आमदार आर्लेकर म्हणाले की, विमानतळासाठी ज्यांच्या जमिनी संपादित झाल्या त्या स्थानिकांच्या हितासाठी त्या वेळच्या लोकप्रतिनिधींनी कोणताही ठोस करार केला नव्हता. त्यामुळे स्थानिकांना अपेक्षित नोकऱ्या आणि लाभ मिळू शकले नाहीत. आता नोकऱ्यांची आश्वासने देणाऱ्यांनी त्यावेळी काय केले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली अनेक स्थानिकांना मोपा विमानतळावर रोजगार उपलब्ध झाला असून भविष्यातही रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

“धारगळ पंचायत भ्रष्टाचारासाठी ओळखली जाते” – भूषण (प्रदीप) नाईक

धारगळचे माजी सरपंच तथा विद्यमान पंच भूषण (उर्फ प्रदीप) नाईक यांनी धारगळ पंचायत मंडळावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. साध्या बांधकामासाठीही नागरिकांकडून ठराविक रक्कम मागितली जाते, असा आरोप करत अशा भ्रष्ट कारभाराला ग्रामस्थांनी आगामी निवडणुकीत धडा शिकवावा, असे आवाहन त्यांनी केले.

नाईक म्हणाले की, आमदार होण्यापूर्वीच कोरोना काळात प्रवीण आर्लेकर यांनी जनतेची सेवा केली. त्यांच्या कार्याची दखल घेऊन भाजपने त्यांना उमेदवारी दिली आणि आज मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू आहेत तसेच रोजगारनिर्मितीलाही चालना मिळत आहे.

“मागील वीस वर्षांत काय विकास झाला?” – प्रीती कानोळकर

पंच प्रीती कानोळकर यांनी आपल्या भाषणात मागील वीस वर्षांत मतदारसंघाचा अपेक्षित विकास झाला नसल्याचा आरोप केला. केवळ आश्वासने देणाऱ्या नेत्यांवर जनतेने विश्वास ठेवू नये. भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून आमदार प्रवीण आर्लेकर यांनाच पुन्हा विजयी करून राज्यभर कमळ फुलवूया आणि विकासाला गती देऊया, असे आवाहन त्यांनी केले.

या बैठकीस धारगळचे माजी सरपंच भूषण (उर्फ प्रदीप) नाईक, पंच प्रीती कानोळकर, शिवानी परब तसेच भाजपचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.