गोवा खबर : सचिवालयात आयोजित करण्यात आलेल्या बुडण्याच्या घटना टाळण्यासाठीच्या गोवा राज्य कृती योजनेच्या आढावा बैठकीत मुख्य सचिव अध्यक्षस्थानी उपस्थित होते. या बैठकीत विविध सरकारी खात्यांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला आणि राज्यभरात बुडण्यामुळे होणारे मृत्यू आणि दुखापती टाळण्यासाठीच्या उपाययोजनांवर सविस्तर चर्चा केली.
बैठकीत भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने तयार केलेली बुडण्यापासून बचाव करण्यावरील माहिती, शिक्षण आणि संवाद साहित्यावर सविस्तर चर्चा झली.
या बैठकीत बुडण्यापासून बचाव करण्याच्या प्रमुख पैलूंवर सखोल चर्चा झाली, ज्यामध्ये मुलांना घरात बुडण्यापासून वाचविणे, जलतरण तलावांसाठी सुरक्षा उपाय, शाळांमध्ये बुडण्यापासून बचाव, जीवनरक्षक कौशल्य म्हणून पोहण्याला प्रोत्साहन देणे, तसेच शहरी आणि ग्रामीण समुदाय, किनारपट्टी आणि जलाशयांमध्ये बुडण्यापासून बचाव करण्याच्या धोरणांचा समावेश होता. जलयानांमध्ये आणि त्यांच्या आजूबाजूला असलेल्या सुरक्षा उपायांचे महत्त्व, तसेच बुडण्यामुळे होणारे मृत्यू आणि दुखापती टाळण्यासाठी योग्य सुरक्षा साधनांचा वापर यावरही चर्चा झाली. मुख्य सचिवांनी जागरूकता, पूर्वतयारी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक मजबूत करण्यासाठी सर्व संबंधित खात्यांचाचा समावेश असलेल्या समन्वित दृष्टिकोनाच्या गरजेवर भर दिला. बुडण्याच्या घटना कमी करण्यासाठी जनजागृती हे सर्वात प्रभावी साधनांपैकी एक आहे यावर त्यांनी जोर दिला.
बुडण्यापासून बचाव करण्याविषयी जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने विकसित केलेले माहिती, शिक्षण आणि संवाद साहित्य मोठ्या प्रमाणावर प्रसारित करण्याचे ठरविण्यात आले. जलसुरक्षेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि जलस्रोतांच्या आसपास जबाबदार वर्तनास प्रोत्साहित करण्यासाठी, विशेषतः संवेदनशील भागांमध्ये, सातत्यपूर्ण जागरूकता मोहीम आणि समुदाय संपर्क कार्यक्रम हाती घेण्याचा सल्लाही खात्यांना देण्यात आला.