Connect with us

गोवा खबर

फळदेसाई यांच्या हस्ते केपे येथील सरकारी महाविद्यालयात नवीन शैक्षणिक सुविधांचे उद्घाटन

Published

on

Spread the love

गोवा खबर:समाजकल्याण मंत्री श्री सुभाष फळदेसाई यांनी आमदार श्री निलेश काब्राल यांच्यासमवेत आज सरकारी कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात संगणक विज्ञान प्रयोगशाळा, स्मार्ट बोर्ड आणि दोन महाविद्यालयीन बसेसचे उद्घाटन केले. दक्षिण गोवा जिल्हा खनिज प्रतिष्ठान (ट्रस्ट) यांच्या आर्थिक सहाय्याने उभारण्यात आलेल्या या सुविधांसाठी एकूण ८१.६० लाख रुपये खर्च आला आहे.

या प्रसंगी अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री रमेश गावकर; सहायक जिल्हाधिकारी (प्रशिक्षणार्थी) श्री मोहम्मद शौकत अझीम, आयएएस, उप जिल्हाधिकारी श्री अमितेश शिरवईकर; मिनरल फाउंडेशन ऑफ गोवाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन तेंडुलकर आणि प्राचार्य डॉ. प्रविणा केरकर उपस्थित होत्या.

उपस्थितांसमोर बोलताना श्री सुभाष फळदेसाई यांनी डिजिटल क्षेत्रातील सततच्या नवनवीन शोधांमुळे जग वेगाने बदलत आहे असे सांगितले. त्यांनी तंत्रज्ञानाने जगाला आपल्या बोटांच्या टोकावर आणले आहे, ज्यामुळे लोकांना काही सेकंदात माहिती मिळविणे, डेटाचे विश्लेषण करणे आणि जगभरातील इतरांशी संपर्क साधणे शक्य झाले आहे असे त्यांनी नमुद केले.

डिजिटल साक्षरतेचे महत्त्व प्रतिपादताना मंत्र्यांनी आजच्या तंत्रज्ञान-चालित जगात डिजिटल ज्ञान अपरिहार्य बनले असून ते मूलभूत साक्षरतेइतकेच आवश्यक आहे असे ते म्हणाले. विविध डिजिटल ॲप्लिकेशन्स दैनंदिन जीवनातील अविभाज्य साधने बनली असून ती शिक्षण, संवाद आणि सर्वांगिण विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत असेही ते म्हणाले.

या प्रसंगी बोलताना आमदार श्री निलेश काब्राल यांनी शिक्षण हा प्रगतीचा पाया असल्याचे सांगितले आणि विद्यार्थ्यांना आधुनिक शैक्षणिक पायाभूत सुविधा व अध्ययन सुविधा पुरविण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. त्यांनी विद्यार्थ्यांना नव्याने उद्घाटन झालेल्या सुविधांचा अधिकाधिक वापर करण्याचे आणि त्यांनी आपली मालमत्ता मानून जबाबदारीने त्यांची देखभाल करण्याचे आवाहन केले.