Connect with us

गोवा खबर

काँग्रेसमध्ये फूट नसून भाजपचा खोटारडेपणा उघड; जनतेची दिशाभूल करण्याचा डाव : तुलिओ डिसोझा

Published

on

Spread the love

गोवा खबर : काँग्रेस पक्षामध्ये कोणतीही फूट किंवा अंतर्गत मतभेद नसून, जनतेची दिशाभूल करून मतांचे ध्रुवीकरण करण्यासाठी भाजपकडून जाणीवपूर्वक खोटे कथानक रचले जात असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेस नेते तुलिओ डिसोझा यांनी केला.

ते म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसची प्रतिमा मलिन करून राजकीय लाभ मिळविण्याच्या उद्देशाने भाजप आणि त्यांची यंत्रणा खोट्या अफवा पसरवत आहे. “काँग्रेस पक्ष पूर्णपणे एकसंघ आहे. पक्षातील सर्व नेते आणि कार्यकर्ते २०२७ मध्ये भ्रष्ट, जनविरोधी आणि अपयशी भाजप सरकारचा पराभव करून काँग्रेसचे सरकार स्थापन करण्यासाठी एकदिलाने काम करत आहेत,” असे त्यांनी स्पष्ट केले.

तुलिओ डिसोझा म्हणाले की, जनतेच्या तीव्र विरोधामुळे भाजप सरकारला आता एकामागून एक निर्णय मागे घ्यावे लागत आहेत. मात्र हा जनतेच्या हिताचा विजय नसून, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेली तात्पुरती माघार आहे. “युनिटी मॉल असो किंवा गावांचे शहरीकरण करण्याचा निर्णय असो, हे सर्व प्रकल्प पुन्हा सत्तेत आल्यास भाजप सरकार नव्याने राबविण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे गोमंतकीय जनतेने त्यांच्या भूलथापांना बळी न पडता या भ्रष्ट आणि असंवेदनशील सरकारला कायमचे सत्तेबाहेर करण्याचा निर्धार केला पाहिजे,” असे त्यांनी म्हटले.

काँग्रेसच्या आमदारांनी विधानसभेत भाजप सरकारचा भ्रष्टाचार सातत्याने उघडकीस आणला असून गोव्याच्या नियोजित विनाशाविरोधात प्रभावी लढा उभारल्याचे त्यांनी नमूद केले. “गोव्याच्या विनाशासाठी भाजप सरकारने गैरवापर केलेले टीसीपी कायद्यातील कलम ३९-अ आणि अशा सर्व जनविरोधी तरतुदी काँग्रेसचे सरकार सत्तेत आल्यानंतर रद्द करण्यात येतील, अशी स्पष्ट हमी काँग्रेसने दिली आहे,” असे तुलिओ डिसोझा यांनी सांगितले.

भाजपच्या खोट्या प्रचाराला बळी न पडण्याचे आवाहन करताना त्यांनी सरकारच्या आर्थिक उधळपट्टीवरही जोरदार टीका केली. “या सरकारने केवळ कमिशनखोरीसाठी आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांवर तब्बल ₹६७० कोटींची उधळपट्टी केली आहे. दुसरीकडे युवक बेरोजगार आहेत, महागाईने सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे आणि लोकांच्या मूलभूत प्रश्नांकडे सरकारने पूर्णपणे पाठ फिरवली आहे. त्यामुळे भाजपला पुन्हा सत्तेत येण्याचा कोणताही नैतिक अधिकार उरलेला नाही,” असा घणाघाती हल्ला तुलिओ डिसोझा यांनी चढविला.