गोवा खबर : गेली २५ वर्षे गोव्याच्या शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या आणि शिशुवाटिकांपासून उच्च माध्यमिक विद्यालयापर्यंत ४४ शिक्षणसंस्था चालविणाऱ्या सरकारमान्य ‘विद्याभारती गोवा’ या शैक्षणिक संघटनेच्या सर्वसाधारण सभेत कोकणीबरोबरच मराठीलाही राजभाषेचा दर्जा द्यावा, या मराठी राजभाषा निर्धार समितीच्या मागणीला सर्वानुमते पाठिंबा देणारा ठराव मंजूर करण्यात आला.
सभेत उपस्थित सर्व सदस्यांनी दोन्ही हात उंचावून सामूहिक ॐकाराच्या गजरात हा ठराव संमत केला.
यावेळी व्यासपीठावर विद्याभारती गोवाचे अध्यक्ष डॉ. सीताराम कोरगावकर, उपाध्यक्ष माधव केळकर, ज्येष्ठ मार्गदर्शक पुरुषोत्तम कामत, संघटन सचिव शशांक कामत, कोषाध्यक्ष सूर्यकांत गावस आणि सहसचिव मनोहर पेडणेकर उपस्थित होते.
ठरावाचे वाचन राज्य शिशुवाटिका प्रमुख ॲड. रोशन रविंद्र सामंत यांनी केले. त्यापूर्वी माधव केळकर यांनी मराठी राजभाषा मागणीची पार्श्वभूमी स्पष्ट करताना, पोर्तुगीजांच्या दमनकाळात मराठी भाषेने गोव्याची संस्कृती आणि राष्ट्रीयता जपली असून, आजही या मूल्यांचे संरक्षण करण्यासाठी मराठीला राजभाषेचा दर्जा मिळणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.
ही माहिती मराठी राजभाषा निर्धार समितीचे निमंत्रक सुभाष भास्कर वेलिंगकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.