गोवा खबर : राज्यातील जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाला गती देण्यासाठी सरकार आगामी १५ दिवसांत ‘माझा फ्लॅट’ योजना जाहीर करणार आहे, अशी महत्त्वाची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली. मेरशी येथे आयोजित ‘सहकार सेवा भवन’च्या उद्घाटन समारंभाप्रसंगी ते बोलत होते.
या कार्यक्रमाला सहकारमंत्री सुभाष शिरोडकर, स्थानिक आमदार रुदोल्फ फर्नांडिस, सहकार निबंधक आशुतोष आपटे, जिल्हा पंचायत सदस्य गौरी कामत आणि सरपंच सुशांत गोवेकर उपस्थित होते.
या योजनेचा थेट फायदा राज्यातील सुमारे ३० ते ४० हजार फ्लॅटधारकांना मिळणार असून, त्यांच्या हक्काचे फ्लॅट त्यांच्या नावावर होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. गोव्यात सध्या जवळपास तीन हजार गृहनिर्माण सोसायट्या आहेत. मात्र, अनेकांच्या फ्लॅटची अधिकृत खरेदी खत (डीड) झालेली नाही; त्यांच्याकडे केवळ शेअर सर्टिफिकेट किंवा प्रतिज्ञापत्र एवढेच दस्तऐवज उपलब्ध आहेत. बऱ्याच इमारतींची जागा अद्याप सोसायटीच्या नावावर झालेली नाही, कारण संबंधित बिल्डरांपैकी काही जण गोव्याबाहेर गेले आहेत तर काही मालक जागा नावावर करून देण्यास तयार नाहीत.
अशा बिकट परिस्थितीत ४० ते ४५ वर्षे जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींची पुनर्बांधणी करणे रहिवाशांना कायदेशीर अडचणींमुळे शक्य होत नव्हते. या सर्व सदनिकाधारकांना मोठा दिलासा देण्यासाठीच सरकार ही सुटसुटीत योजना आणत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. पूर्वी जाहीर केलेल्या ‘माझे घर’ योजनेला जसा जनतेचा भरघोस प्रतिसाद मिळाला, तसाच प्रतिसाद या ‘माझा फ्लॅट’ योजनेलाही लाभेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ग्रामीण विकास, उद्योग आणि सहकार क्षेत्राच्या प्रगतीसाठी सरकार नाबार्डच्या आर्थिक सहाय्याने विविध विकासकामांना गती देत असल्याचेही त्यांनी शेवटी नमूद केले.