Connect with us

गोवा खबर

काँग्रेस पक्षातर्फे पणजीतून मलाच उमेदवारी : फुर्तादो

Published

on

Spread the love

गोवा खबर : २०२७ ची विधानसभा निवडणूक आपण काँग्रेसच्या तिकिटावरून पणजी मतदारसंघातून लढवणार असा पुनरुच्चार पणजी महानगरपालिकेचे (मनपा) माजी महापौर सुरेंद्र फुर्तादो यांनी केला आहे. पणजीतून नक्कीच निवडून येणार. मंत्री बाबूश मोन्सेरात यांना कडी टक्कर देण्याची तयारी आहे. उमेदवारीबाबत आपली काँग्रेस सोबत चर्चा झाली असून विद्यमान तसेच माजी प्रदेशाध्यक्षांना देखील याची कल्पना असल्याचे त्यांनी सांगितले.

फुर्तादो म्हणाले की, विधानसभा निवडणुकीला सहा ते आठ महिने बाकी आहेत. त्यानुसार आपल्याला पणजीतून काँग्रेसची उमेदवारी मिळेल याचा पूर्ण विश्वास आहे. मी पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता असून त्यांनी माझे काम पाहिले आहे. त्यामुळे पणजीची उमेदवारी मलाच मिळेल याची पूर्ण खात्री असून तशी चर्चाही पक्षासोबत झाली आहे. त्यादिशेने शहरात मी कामाला सुरुवातही केली आहे. माझ्याकडे अनेक वर्षांचा नगरसेवक तसेच महापौरपदाचा अनुभव असल्याचे त्यांनी सांगितले. पणजीच्या लोकांनी माझे काम पाहिले आहे. त्यामुळे २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत मी आमदार म्हणून जिंकून येणार याचा मला पूर्ण विश्वास आहे. पणजीच्या मतदारांकडून मला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे काँग्रेसची उमेदवारी मिळण्यावरही मी ठाम असल्याचा पुनरुच्चारही फुर्तादो यांनी यावेळी केला.