गोवा खबर : फोंडा येथील एका इमारतीत खाजगी बैठकीसाठी आलेल्या वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांना आम आदमी पक्षाच्या चार कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला. या प्रसंगामुळे मगोप आणि आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याने काही काळ वातावरण अत्यंत तंग झाले होते, मात्र पोलीस निरीक्षक मोहन गावडे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.
सविस्तर वृत्तानुसार, मंत्री ढवळीकर सकाळी हॉटेलमध्ये खाजगी बैठकीसाठी आले असता ही माहिती मिळताच आपचे संदेश तेलेकर, ममता माबीन, नॅश कुतिन्हो व गीतेश नाईक हे हॉटेलच्या इमारती खाली आले आणि त्यांनी घोषणाबाजी करत काळे झेंडे दाखवण्यास सुरुवात केली. त्याला मगोपच्या कार्यकर्त्यांनी ‘सुदिन ढवळीकर यांचा विजय असो’ अशा प्रतिघोषणा देऊन उत्तर दिले.
या कृतीवर मगोपचे नेते व कवळ्याचे माजी सरपंच राजेश कवळेकर यांनी तीव्र आक्षेप घेत म्हटले की, आपची ही कृती पूर्णपणे निंदनीय असून प्रसिद्धी मिळवण्यासाठी हा स्टंट करण्यात आला आहे. दुसरीकडे, आपचे संदेश तेलेकर यांनी स्पष्ट केले की जोपर्यंत सुदिन ढवळीकर हे सामान्य लोकांची माफी मागत नाहीत, तोपर्यंत प्रत्येक ठिकाणी असेच आंदोलन सुरू राहील. ढवळीकर हे भाजपला सांभाळून घेण्यासाठी धडपडत असून ज्या दिवशी ते भाजपची पाठराखण करणे बंद करतील, त्या दिवशी भाजप त्यांना धडा शिकवेल असा दावाही त्यांनी केला.