Connect with us

गोवा खबर

कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या शिखरावर सुवर्णकलशाचा लखलखाट; गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांचे योगदान

Published

on

Spread the love

गोवा खबर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या शिखरावर नऊ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अखेर सुवर्णकलशाचा लखलखाट पाहायला मिळाला. मंदिर संवर्धनाचे काम पूर्ण झाल्यानंतर अत्यंत पवित्र वातावरणात हा कलशारोहण विधी पार पडला. विशेष म्हणजे, तीन शक्तीपीठांपैकी एक पूर्ण पीठ असलेल्या या प्राचीन मंदिरासाठी गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे आणि त्यांच्या कुटुंबियांनी साडेतीन कोटी रुपये किमतीचा हा दीड किलो सोन्याचा कलश दान केला आहे. या तांब्याच्या कलशावर सोन्याचा प्रखर पत्रा चढवण्यात आला असून, राणे कुटुंबियांच्या या दानाची सध्या सर्वत्र चर्चा आणि कौतुक होत आहे.

गुरुवारी रात्री ९ वाजता क्रेनच्या साहाय्याने कलशाचे विविध पार्ट शिखरावर चढवण्याचे काम सुरू झाले. रात्री ११ वाजता प्रत्यक्ष कलश बसवण्याच्या कामाला सुरुवात झाली जी सलग नऊ तास सुरू होती. पहाटेच्या काकड आरतीच्या वेळी या नूतन कलशाची थोडक्यात पूजा करण्यात आली आणि अखेर शुक्रवारी सकाळी ८ वाजता हे काम पूर्ण झाले. हे काम सुरू असताना देवस्थान समितीचे सर्व अधिकारी रात्रभर मंदिरात उपस्थित होते. मंगळूरहून आलेले दहा कारागीर आणि मंदिर संवर्धनाचे काम करणारे कर्मचारी अशा एकूण २५ जणांनी मिळून हा कलश शिखरावर यशस्वीरी्या बसवला.

यापूर्वी मंदिर संवर्धनाचे काम सुरू असताना सर्व पाच शिखरांवरील कलश आणि त्यातील प्राण उतरवण्यात आले होते. सोन्याचा कलश कुठेही सुरक्षित ठेवणे शक्य नसल्याने तो तातडीने बसवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याआधी गणपती मंदिरावरील कळसावर याचा यशस्वी डेमो देखील घेण्यात आला होता. मंदिर संवर्धनाचे उर्वरित काम पूर्ण झाल्यानंतर लवकरच धार्मिक विधीपूर्वक मुख्य कलशारोहण सोहळा आयोजित केला जाईल, अशी माहिती देवस्थान समितीच्या वतीने देण्यात आली आहे.