Connect with us

गोवा खबर

…हे काँग्रेस-भाजपचे जॉइंट व्हेंचर : सरदेसाई यांनी युतीची शक्यता फेटाळली

Published

on

Spread the love

गोवा खबर : गोवा फॉरवर्ड पार्टीचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी भाजपसोबतच्या युतीची शक्यता पूर्णपणे फेटाळून लावली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी केलेल्या युतीच्या चर्चेबाबत सरदेसाई यांनी आक्रमक भूमिका घेत, ‘हा सर्व प्रकार म्हणजे भाजप आणि तथाकथित मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसचे जॉइंट व्हेंचर’ असल्याचा पलटवार केला आहे. त्याच वेळी आपल्याला २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेससोबत युतीचीही अद्याप पूर्ण खात्री नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

विजय सरदेसाई यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, आम्हाला आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेससोबतच्या युतीची अद्याप खात्री नाही, मग भाजपसोबत हातमिळवणी करण्याचा प्रश्नच येत नाही. भाजप आपल्याला ‘बी-टीम’ ठरवून गोमंतकीयांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, आम्ही स्वाभिमानी आणि आत्मसन्मान जपणारे लोक आहोत, आमचा भाजपशी कोणताही संबंध नाही. मतदारांचे लक्ष विचलित करण्यासाठी आणि दिशाभूल करण्यासाठीच हा खोटा प्रचार केला जात आहे. कला अकादमीच्या मुद्द्यावरून आपण सरकारला हायकोर्टात खेचले असून, यापुढेही भाजपच्या जनविरोधी धोरणांविरुद्ध आपला लढा सुरूच राहील आणि आम्ही नेहमी जनतेसोबत राहू, असे आमदार सरदेसाई यांनी स्पष्ट केले.