गोवा खबर : भारतीय हवामान विभागाच्या (IMD) गोवा केंद्राने जारी केलेल्या ताज्या अंदाजानुसार, उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्ह्यांसाठी ९ जूनपर्यंत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या कालावधीत काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस, विजांचा कडकडाट आणि ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
हवामान विभागाच्या जिल्हानिहाय इशारा नकाशानुसार, ८ आणि ९ जून रोजी दोन्ही जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळी हवामान राहण्याचा अंदाज आहे. तसेच ८ ते ११ जून दरम्यान काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
१२ जून रोजीही यलो अलर्ट कायम राहणार असून त्यानंतर १३ आणि १४ जून रोजी कोणताही हवामान इशारा नसल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, पर्जन्यमानाच्या अंदाजानुसार ८ ते १४ जून या संपूर्ण आठवड्यात गोव्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाची शक्यता कायम राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी विशेषतः वीज चमकत असताना सुरक्षित ठिकाणी राहावे आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.