गोवा खबर : गोवा घटक राज्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. गोव्याची समृद्ध संस्कृती, ऐतिहासिक वारसा, नैसर्गिक सौंदर्य आणि येथील प्रेमळ नागरिकांची ओळख संपूर्ण देशभर असल्याचे त्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
पंतप्रधान मोदी यांनी गोव्याच्या प्रगतीसाठी आणि अस्मितेसाठी अथक परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे यावेळी कृतज्ञतापूर्वक स्मरण केले. गोव्याच्या विकासात योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या कार्याची आठवण ठेवण्याचा हा दिवस असल्याचे त्यांनी नमूद केले.
गोवा पुढील काळातही प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करत विकसित भारताच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. तसेच प्रत्येक गोमंतकीयाच्या उत्तम आरोग्यासाठी आणि समृद्धीसाठी प्रार्थना करत त्यांनी राज्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या.
गोव्याच्या सांस्कृतिक वारशाचे जतन करत राज्याने विकासाची नवी उंची गाठावी, अशी अपेक्षाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संदेशातून व्यक्त केली आहे.