गोवा खबर : मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी माहिती दिली आहे की, ‘माझे घर’ योजनेअंतर्गत येत्या १० जूनपर्यंत आणखी ३,००० सदनांचे कायदेशीर मालकी हक्क आदेश वितरित केले जातील. केंद्र सरकारला १२ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने राज्यातील प्रत्येक मतदारसंघात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.
या योजनेमुळे सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या हक्काच्या घरांची कागदपत्रे थेट पंचायत स्तरावर मिळणार असून, सरकारी कार्यालयांमधील फेऱ्या कमी होऊन प्रक्रिया पारदर्शक होणार आहे. याशिवाय पर्यावरण संवर्धनासाठी ‘ग्रीन कॉरिडॉर’ उपक्रमांतर्गत ५ जून ते ५ सप्टेंबर दरम्यान राष्ट्रीय व राज्य महामार्गांच्या दुतर्फा १० लाख रोपांची लागवड केली जाईल. तसेच, जागतिक आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवण्याचे निर्देश सर्व सरकारी विभागांना देण्यात आले आहेत.