Connect with us

गोवा खबर

म्हार्दोळ येथे ३१ मे रोजी एकदिवसीय राज्यस्तरीय मंदिर न्यास परिषदेचे आयोजन

Published

on

Spread the love

गोवा खबर : गोव्यातील मंदिरांना भेडसावणारे विविध प्रश्न, त्यांची सुरक्षा आणि मंदिर संस्कृतीचे रक्षण यांवर व्यापक चर्चा करण्यासाठी गोमंतक मंदिर महासंघ आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, ३१ मे रोजी म्हार्दोळ येथील श्री महालसा संस्थानच्या सिंहपुरुष सभागृहात सकाळी १० ते सायंकाळी ६.३० या वेळेत ‘राज्यस्तरीय मंदिर न्यास परिषद’ आयोजित करण्यात आली आहे.

गोमंतक मंदिर महासंघाचे सचिव जयेश थळी यांनी फोंडा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या पत्रकार परिषदेला हिंदु जनजागृती समितीचे राज्य संघटक सत्यविजय नाईक, फोंडा येथील श्री केशव देवस्थानचे संजय घाटे, शिरोडा येथील श्री शिवनाथी देवस्थानचे जयंत मिरिंगकर, बांदोडा येथील श्री महालक्ष्मी संस्थानचे आशुतोष सरदेसाई आणि ढवळी येथील श्री भगवती देवस्थानचे प्रदीप बखले उपस्थित होते.

गोव्यात मंदिरांना मिळणारे अपुरे धन, तोकडी सुरक्षा व्यवस्था, मंदिरांची भूमी बळकावण्याचे प्रकार आणि पोर्तुगिजांनी उद्ध्वस्त केलेल्या काही मंदिरांचा अद्याप न झालेला जीर्णोद्धार अशा अनेक गंभीर समस्या सध्या निर्माण झाल्या आहेत. या समस्यांचे निराकरण करण्यासाठी, मंदिरांचे भक्कम संघटन उभारण्यासाठी आणि त्यांचे प्रश्न सरकार दरबारी मांडण्यासाठी ही परिषद महत्त्वाची ठरणार आहे. या एकदिवसीय परिषदेत विविध निमंत्रित मंदिरांचे विश्वस्त, प्रतिनिधी, पुरोहित, मंदिरांच्या रक्षणासाठी कायदेशीर लढा देणारे अधिवक्ता आणि अभ्यासक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

परिषदेविषयी अधिक माहिती देताना सत्यविजय नाईक यांनी सांगितले की, मंदिर महासंघाकडे १७ हजारांहून अधिक विश्वस्त, पुरोहित आणि धार्मिक संस्थांचे संघटन असून महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आदी राज्यांतील २४०० हून अधिक मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता (ड्रेस कोड) यशस्वीपणे लागू करण्यात आली आहे. महासंघाने महाराष्ट्रातील मंदिरांची शेकडो एकर जमीन घोटाळेबाजांपासून वाचवली असून कर्नाटकात मंदिरांचे धन घेणाऱ्या अन्यायकारक विधेयकाला विरोध केला आहे. या परिषदेत उच्च न्यायालयाचे अधिवक्ता सुरेश रिवाणकर, अधिवक्ता सुरेश राव आणि हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.

या परिषदेत प्रामुख्याने मंदिरांची सुरक्षा, मंदिर परिसर मद्य-मांस मुक्त करणे, मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करणे, पोर्तुगिजांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांची भूमी हिंदूंना परत मिळवून देणे, मंदिरे धर्मशिक्षणाची केंद्र बनवणे आणि मंदिर-जत्रा उत्सवाच्या ठिकाणी हिंदू सोडून अन्य धर्मीयांना स्टॉल उभारण्यास परवानगी न देणे यांसारख्या प्रमुख विषयांवर सखोल चर्चा होणार आहे. ही परिषद केवळ निमंत्रितांसाठी मर्यादित असून इच्छुकांनी सहभागी होण्यासाठी दिलेल्या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना ढवळी येथील श्री भगवती देवस्थानचे प्रदीप बखले यांनी स्पष्ट केले की, सर्वच क्षेत्रांतील लोकांच्या संघटना आहेत, परंतु मंदिर पदाधिकाऱ्यांची हक्काची संघटना नव्हती. या महासंघाच्या माध्यमातून मंदिर पदाधिकारी संघटित होऊन आपले प्रश्न सरकारच्या समोर मांडू शकतील. तसेच फोंडा येथील श्री केशव देवस्थानचे संजय घाटे यांनी मंदिरांमधून हिंदूंना धार्मिक शिक्षण देणे आवश्यक असल्याचे सांगून, यामुळे धर्माविषयीच्या अंधश्रद्धा दूर होण्यास मोठी मदत होईल असा विश्वास व्यक्त केला.