Connect with us

गोवा खबर

तांबडी सुर्ल्यातील बाराभूमी हायस्कूलमध्ये पॅक्ट फाउंडेशनतर्फे ‘हॅपी स्कूल प्रोजेक्ट’चे उद्घाटन

Published

on

Spread the love

गोवा खबर : साकोर्डा-धारबांदोडा परिसरातील ग्रामीण शिक्षणाला चालना देण्यासाठी पॅक्ट फाउंडेशनतर्फे तांबडी सुर्ला येथील बाराभूमी हायस्कूलमध्ये ‘हॅपी स्कूल प्रोजेक्ट’चे उद्घाटन करण्यात आले. पॅक्टच्या पूर्ण आर्थिक सहाय्याने राबविण्यात आलेल्या या उपक्रमांतर्गत शाळेत दोन अत्याधुनिक स्मार्ट वर्गखोल्या उभारण्यात आल्या असून त्यात एआय-सक्षम स्मार्ट बोर्ड बसविण्यात आले आहेत. तसेच विद्यार्थ्यांसाठी नवीन बाके आणि वर्गखोल्यांचे संपूर्ण नूतनीकरण करण्यात आले आहे.

पश्चिम घाटाच्या निसर्गरम्य पायथ्याशी, तांबडी सुर्ला महादेव मंदिराजवळ वसलेले बाराभूमी हायस्कूल धारबांदोडा तालुक्यातील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण देते. या विद्यार्थ्यांपैकी अनेक जण आपल्या कुटुंबातील पहिल्या पिढीतील शिकणारे आहेत. अशा विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज वर्गखोली ही उच्च शिक्षणाकडे जाण्याची मोठी संधी ठरते. हा उपक्रम संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास ध्येय क्रमांक ४ (गुणवत्तापूर्ण शिक्षण) तसेच ग्रामीण-शहरी शैक्षणिक दरी कमी करण्याच्या ध्येय क्रमांक १० (असमानता कमी करणे) यांना हातभार लावणारा आहे.

कार्यक्रमात बाराभूमी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष गंगाराम गावकर यांनी पॅक्ट फाउंडेशनचे आभार मानले. “गोव्याच्या टोकाला असलेल्या आमच्या शाळेसाठी अशा प्रकारचे सहकार्य अत्यंत मोलाचे आहे. आमची संस्था विद्यार्थ्यांना चांगले वातावरण देण्यासाठी प्रयत्नशील आहे, मात्र शिक्षक एकटे हे करू शकत नाहीत. या स्मार्ट वर्गखोल्यांमुळे आमच्या विद्यार्थ्यांनाही शहरातील शाळांप्रमाणे जगाशी जोडले जाण्याची संधी मिळाली आहे,” असे ते म्हणाले. “विद्यार्थ्यांनी या सुविधांचा पूर्ण उपयोग करून बदलत्या जगाशी स्पर्धा करावी आणि आयुष्यात यशस्वी व्हावे,” असे आवाहनही त्यांनी केले.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि पॅक्ट फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. अश्विन फर्नांडिस यांनी ‘हॅपी स्कूल प्रोजेक्ट’ हा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मागे पडू न देण्यासाठीचा छोटासा पण मनापासूनचा प्रयत्न असल्याचे सांगितले. उत्तर गोव्यातील गावातून जागतिक शिक्षण आणि प्रकाशन क्षेत्रात पोहोचलेल्या आपल्या प्रवासाचा उल्लेख करत त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरित केले.

“तुमच्यापैकी अनेक जण कुटुंबातील पहिल्या पिढीतील शिकणारे आहात आणि ती तुमची कमतरता नसून ताकद आहे. इंटरनेटमुळे तांबडी सुर्ल्यासारख्या गावातील मुलांसाठीही जग जवळ आले आहे,” असे डॉ. फर्नांडिस म्हणाले. “हे एआय-सक्षम स्मार्ट बोर्ड म्हणजे केवळ भिंतीवरील स्क्रीन नाहीत, तर भविष्यातील रोजगाराच्या संधींकडे नेणारे दार आहेत. मात्र तंत्रज्ञानाचा वापर जबाबदारीने करा. विज्ञान, क्रीडा, संगीत, शेती, कला अशा विविध क्षेत्रांचा अभ्यास करा आणि पुढे जाऊन आपल्या गावाच्या विकासासाठी योगदान द्या,” असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.

बाराभूमी हायस्कूलमधील या उपक्रमामुळे पॅक्ट फाउंडेशनच्या ग्रामीण शिक्षण उपक्रमांच्या यादीत आणखी एका गोमंतकीय शाळेची भर पडली आहे. या उपक्रमांत गोवा सुपर १०० शिष्यवृत्ती योजना तसेच राज्यभरातील युवक विकास कार्यक्रमांचाही समावेश आहे.