गोवा खबर : देशभरात आणि विशेषतः गोवा राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या मागणीत प्रचंड वाढ झाली असली, तरी नागरिकांना घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही. सार्वजनिक क्षेत्रातल्या प्रमुख तेल विपणन कंपन्यांनी संपूर्ण गोव्यात इंधनाचा अखंडित आणि सुरळीत पुरवठा सुनिश्चित केला आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपन्यांनी देशभरासह गोव्यातही पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा पुरवठा विनाव्यत्यय सुरू ठेवण्याचे आश्वासन दिले आहे.
वाढती मागणी लक्षात घेऊन कंपन्यांनी समन्वित कार्यवाही आणि कार्यक्षम वितरण व्यवस्थापन सुरू ठेवले आहे, जेणेकरून ग्राहकांना कोणत्याही समस्येचा सामना करावा लागणार नाही.
अलीकडच्या काळात पेट्रोलियम उत्पादनांच्या मागणीत लक्षणीय वाढ नोंदवली गेली आहे. गोव्याचा विचार केला तर, गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत चालू वर्षात म्हणजेच १ मे ते २४ मे २०२६ या काळात पेट्रोलच्या किरकोळ विक्रीत ७.६२ टक्के वाढ झाली आहे. तर याच काळात डिझेलच्या किरकोळ विक्रीत तब्बल १०.०७ टक्के एवढी मोठी वाढ झाली आहे. या वाढीव मागणीमागे प्रामुख्याने सध्या सुरू असलेले हंगामी कृषी उपक्रम हे मुख्य कारण आहे. त्याचसोबत इतर खाजगी पुरवठादारांच्या तुलनेत सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या दरांमध्ये असलेल्या फरकामुळे संस्थात्मक आणि व्यावसायिक ग्राहकांचा कल सरकारी पेट्रोल पंपांकडे अधिक वाढला आहे.
या पार्श्वभूमीवर तेल उद्योगाने जनतेला आश्वस्त केले आहे की, देशभरात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. पुरवठा साखळी सुरळीत ठेवण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलली जात आहेत. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवून गरजेपेक्षा जास्त खरेदी करू नये, तसेच बाजारात गर्दी करून ‘पॅनिक बायिंग’ म्हणजेच घाबरून खरेदी करणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. इंधनाच्या उपलब्धतेबाबत अचूक आणि विश्वासार्ह माहिती मिळवण्यासाठी नागरिकांनी केवळ अधिकृत संस्था आणि तेल कंपन्यांनी जारी केलेल्या अधिकृत निवेदनांवरच विसंबून राहावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.