गोवा खबर : आरजीपीचे आमदार विरेश बोरकर यांनी आपण २०२७ ची विधानसभा निवडणूक रिव्होल्युशनरी गोवन्स पार्टी (RGP) च्याच तिकिटावर लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. काँग्रेसमध्ये जाण्याच्या चर्चा आणि अफवा फेटाळून लावत त्यांनी आपण पक्षासोबतच कायम असल्याचे सांगितले.
माध्यमांशी बोलताना बोरकर म्हणाले की, पक्षातील मतभेद आणि सुरू असलेल्या घडामोडींवर चर्चा करण्यासाठी ते लवकरच आरजीपी कार्यालयात जाणार असून पक्ष पदाधिकाऱ्यांच्या भावना आणि प्रश्न ऐकून घेणार आहेत. त्याचबरोबर आपणही आपली बाजू पक्षासमोर मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.
“हा आमच्या पक्षातील अंतर्गत लोकशाहीचा विषय आहे. कोणतीही सविस्तर सार्वजनिक भूमिका मांडण्यापूर्वी मी पक्षातील सदस्यांशी चर्चा करणार आहे,” असे बोरकर यांनी स्पष्ट केले.
काही दिवसांपासून आपण वैद्यकीय कारणांमुळे गोव्याबाहेर होतो, असेही त्यांनी सांगितले. आरजीपी अध्यक्ष मनोज परब यांच्या राजीनाम्याबाबत विचारले असता बोरकर म्हणाले, “मनोज माझ्या हृदयात आहेत.”
दरम्यान, राज्य सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशन घाईघाईत तहकूब करून आमदारांना महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्याचा अधिकार नाकारल्याचा आरोपही बोरकर यांनी केला. गोवा आणि गोवेकरांच्या हिताचे अनेक महत्त्वाचे विधेयक प्रलंबित असल्याने विधानसभा पुन्हा बोलावण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
यासाठी सर्व आमदार मिळून विधानसभा अध्यक्षांकडे अधिवेशन पुन्हा सुरू करण्याची मागणी करणार असल्याचेही बोरकर यांनी सांगितले.