गोवा खबर : पणजीचे महापौर रोहित मोन्सेरात यांनी नुकतीच राजधानीतील स्टेला मॅरिस परिसरात स्वच्छता पाहणी केली आणि स्थानिक रहिवाशांशी थेट संवाद साधला. या भेटीदरम्यान नागरिकांनी कचरा व्यवस्थापन, नियमित साफसफाई, नाल्यांची देखभाल आणि सार्वजनिक ठिकाणांच्या स्वच्छतेबाबतच्या विविध समस्या महापौरांसमोर मांडल्या.
महापौरांनी या सर्व तक्रारी आणि सूचना गांभीर्याने ऐकून घेतल्या, तसेच संबंधित अधिकाऱ्यांना यावर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी नागरिक आणि प्रशासन यांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगत, महापौरांनी नागरिकांनाही कचरा योग्य ठिकाणी टाकण्याचे आणि स्वच्छता मोहिमेत सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन केले.
या पाहणीनंतर आता परिसरात नागरी सुविधांचा दर्जा सुधारेल, अशी आशा स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.