Connect with us

गोवा खबर

चिंबलच्या उपासना कुमारीची आंतरराष्ट्रीय Codeavour स्पर्धेत चमक; गोव्याचा जागतिक स्तरावर गौरव

Published

on

Spread the love

गोवा खबर : गोव्यातील युनियन हायस्कूल, चिंबल येथील विद्यार्थिनी उपासना कुमारी हिने आंतरराष्ट्रीय Codeavour स्पर्धेत विशेष यश संपादन करत गोव्याचे नाव जागतिक स्तरावर उज्वल केले आहे. प्रादेशिक फेरीपासून सुरू झालेला हा प्रवास बंगळुरू येथील राष्ट्रीय फेरीमार्गे इंडोनेशियातील जकार्ता येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेपर्यंत पोहोचला.

या संपूर्ण प्रवासात अनेक अडचणी, आव्हाने आणि अडथळ्यांना सामोरे जावे लागले. मात्र विद्यार्थ्यांची जिद्द, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि सर्वांच्या सहकार्यामुळे हे यश मिळाले. GSCERTच्या संचालिका मेघना शेटगांवकर, आशिष ठाकूरदेसाई तसेच कोडिंग तज्ज्ञ व मार्गदर्शक व्यंकटेश प्रभू यांच्या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांना मोठी मदत झाली.

प्रकल्पाचे विवरण कसे द्यावे, प्रदर्शन पाहायला आलेल्या लोकांसमोर किंवा तज्ञांसमोर कशा पद्धतीने आपले विचार मांडावे किंवा आम्ही जो प्रकल्प केलेला आहे तो कशा पद्धतीने सादर करावा याचे पूर्ण प्रशिक्षण ध्रुव कटारिया यांनी दिले.

विद्यार्थिनी उपासना कुमारी आणि कविता राठोड यांना शिक्षक दिलीप वझे यांनी मार्गदर्शन केले. मात्र पासपोर्ट संदर्भातील अडचणीमुळे कविता राठोडला आंतरराष्ट्रीय फेरीत सहभागी होता आले नाही. तरीही उपासना कुमारीने आत्मविश्वासाने स्पर्धेत सहभाग घेत विशेष श्रेणी पुरस्कार आणि विशेष शिफारस मिळवली.

Codeavour च्या Track 1 स्पर्धेत ६७ देशांतील १०० हून अधिक संघ सहभागी झाले होते. त्यापैकी केवळ १२ विद्यार्थ्यांची पुरस्कारासाठी निवड झाली असून उपासना कुमारी त्यामध्ये स्थान मिळवणारी विद्यार्थिनी ठरली. विशेष म्हणजे संपूर्ण स्पर्धेत भारतातील केवळ तीन विद्यार्थ्यांना हा सन्मान मिळाला.

उपासना कुमारी ही चिंबल, तिसवाडी येथील युनियन हायस्कूलची विद्यार्थिनी असून अत्यंत मर्यादित सुविधा आणि साधनांमध्ये तिने हे यश मिळवले आहे. तिचे वडील बस कंडक्टर म्हणून काम करतात, तर आई घरकाम करून कुटुंबाला हातभार लावते. कठीण परिस्थितीतही गेल्या चार ते पाच महिन्यांपासून तिने शिक्षक दिलीप वझे यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने मेहनत घेतली.

शाळेच्या मुख्याध्यापिका निर्मला नाईक यांनी शाळेकडून सर्वतोपरी सहकार्य केले. शिक्षिका वैभवी साळगावकर यांनी गोव्यापासून बंगळुरू आणि पुढे इंडोनेशियापर्यंत विद्यार्थ्यांच्या प्रवासात साथ दिली. चित्रकला शिक्षक दीपाराज वळवईकर यांनी प्रकल्पासाठी बॅनर आणि किऑस्क डिझाइन करण्यात मदत केली. तसेच क्रीडा शिक्षक दयेश वेणगुर्लेकर यांनी निधी उभारणी आणि राष्ट्रीय स्तरावरील यशानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट आयोजित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

हे यश केवळ विद्यार्थ्यांचे नसून युनियन हायस्कूल, गोवा आणि या प्रवासात साथ देणाऱ्या प्रत्येकासाठी अभिमानाचा क्षण असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.