गोवा खबर : गोव्यात मद्यविक्री करणाऱ्या दुकानांना हिंदु देवतांची किंवा धार्मिक प्रतीकांची नावे देण्यावर तातडीने बंदी घालण्यात यावी, अशी आग्रही मागणी गोमंतक मंदिर महासंघाने राज्य सरकारकडे केली आहे. या संदर्भात महासंघाच्या एका शिष्टमंडळाने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे सविस्तर निवेदन सादर केले.
हिंदू धर्मात अत्यंत पूजनीय असलेल्या देवतांची नावे दारूच्या दुकानांना दिल्याने धार्मिक भावना दुखावल्या जात असून समाजात चुकीचा संदेश जात असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.
मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करणाऱ्या या शिष्टमंडळात गोमंतक मंदिर महासंघाचे जयेश थळी, हिंदु जनजागृती समितीचे गोवा राज्य समन्वयक गोविंद चोडणकर, युवराज गावकर, रघुनाथ मडकईकर आणि विशाखा म्हाम्बरे यांचा समावेश होता. सध्या गोव्यामध्ये अनेक ठिकाणी मद्यविक्रीच्या दुकानांना हिंदु देवतांची नावे किंवा हिंदूंच्या धार्मिक प्रतिमांचा संदर्भ वापरून व्यावसायिक नावे दिली जात असल्याबद्दल शिष्टमंडळाने तीव्र चिंता व्यक्त केली आहे.
महासंघाने आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे की, हिंदु धर्मामध्ये देवतांना सर्वोच्च आदर आणि श्रद्धेचे स्थान आहे. त्यामुळे मद्यविक्रीसारख्या व्यवसायाशी देवतांची नावे जोडणे हा थेट देवाचा अनादर ठरेल. अशा प्रकारांमुळे सर्वसामान्य हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्या जात आहेत. सरकारने या संवेदनशील विषयाची गंभीर दखल घेऊन मद्यविक्री व्यवसायासाठी धार्मिक प्रतीकांचा किंवा देवतांच्या नावांचा वापर केला जाऊ नये यासाठी स्पष्ट आणि कडक नियम लागू करावेत, अशी मागणी महासंघाने केली आहे.
भविष्यात असा कोणताही प्रकार घडू नये यासाठी सरकारने कठोर कायदा करावा, अशी विनंतीही मुख्यमंत्र्यांना करण्यात आली आहे. यासोबतच, ज्या दारूच्या दुकानांना सध्या हिंदु देवतांची नावे देण्यात आली आहेत, त्या दुकानांच्या मालकांना ही नावे त्वरित बदलण्याचे कायदेशीर निर्देश राज्य सरकारने जारी करावेत, अशी मागणी गोमंतक मंदिर महासंघाचे जयेश थळी यांनी निवेदनाद्वारे केली आहे.