गोवा खबर : कोकणी भाषा आणि संस्कृतीचा समृद्ध वारसा जतन करण्यासाठी गोवा सरकारच्या ‘गोवा कोकणी अकादमी’ने “कोकणी भाषा साहित्य शिल्पकार कोश” तयार करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. या कोशाच्या माध्यमातून कोकणी चळवळ, साहित्य, कला आणि शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या कार्याची अधिकृत नोंद केली जाणार असून, जनतेने यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन अकादमीने केले आहे.
या कोशासाठी भाषा चळवळीतील कार्यकर्ते, कवी, लेखक, नाटककार, तियात्रिस्त, चित्रपट कलाकार, संगीतकार, लोककलाकार, संशोधक, शिक्षक आणि पत्रकारांची माहिती मागवण्यात आली आहे. कोकणी भाषेच्या प्रगतीसाठी ज्या ज्येष्ठ व्यक्तींनी आणि कलाकारांनी आपले आयुष्य वेचले आहे, त्यांची ओळख पुढील पिढीला करून देणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे.
माहिती देऊ इच्छिणाऱ्यांनी आपले पूर्ण नाव, पत्ता, जन्मतारीख, शिक्षण, संपर्क क्रमांक आणि कार्याचा सविस्तर तपशील (प्रकाशित पुस्तके, नाटके, पुरस्कार इ.) देणे आवश्यक आहे. ही माहिती ५०० शब्दांत, कोकणी देवनागरी लिपीत (UNICODE – INSCRIPT) टाईप करून सोबत पासपोर्ट साईज फोटो जोडावा लागेल. संबंधित व्यक्तींनी स्वतःची माहिती भरावी, तसेच ज्या ज्येष्ठ व्यक्ती आज हयात नाहीत, त्यांची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी किंवा जाणकारांनी उपलब्ध करून द्यावी, अशी विनंती करण्यात आली आहे.
इच्छुकांनी आपली माहिती https://forms.gle/BwSPJaHNdetkbhWX9 या गुगल लिंकवर भरावी. प्राप्त माहितीची छाननी अकादमीने नियुक्त केलेल्या तज्ज्ञ समितीमार्फत केली जाईल. कोकणी अस्मितेचा हा महत्त्वाचा दस्तऐवज परिपूर्ण करण्यासाठी सर्व कोंकणी प्रेमींनी आपला हातभार लावावा, असे आवाहन गोवा कोंकणी अकादेमीतर्फे करण्यात आले आहे.